nikhil kamath book recommendations : एखादा यशस्वी उद्योगपती किंवा गुंतवणूकदार कसा विचार करतो, हे अनेकदा त्यांनी वाचलेल्या पुस्तकांवरून कळून येते. प्रसिद्ध ब्रोकरेज प्लॅटफॉर्म झिरोधाचे संस्थापक निखिल कामथ यांच्या वाचनाची आवड केवळ फायनान्स किंवा शेअर बाजारापुरती मर्यादित नाही. राजकारण, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि जागतिक बाजारपेठेचे पतन अशा विविध विषयांवर त्यांनी सखोल वाचन केले आहे. नुकतीच त्यांनी आपल्या आवडत्या ७ पुस्तकांची यादी जाहीर केली आहे.
१. डेंग शियाओपिंग अँड द ट्रान्सफॉर्मेशन्स ऑफ चायना (लेखक: एझ्रा एफ व्होगेल)
चीनचे आधुनिक अर्थव्यवस्थेत रुपांतर करणाऱ्या डेंग शियाओपिंग यांच्या प्रशासनावर हे पुस्तक आधारित आहे. हे पुस्तक एवढं जाडजूड आहे, की कामथ यांना वाचण्यासाठी सुमारे दोन महिने लागले. “लोकांना बदल हवा असतो, पण स्वतः बदलणे आवडत नाही,” असा राजकीय आणि सामाजिक सल्ला हे पुस्तक देते. जर तुम्हाला एखादा मोठा बदल घडवायचा असेल, तर “मनापासून नसले तरी चालेल, पण तुमच्या आधीच्या व्यक्तीचे कौतुक करायला विसरू नका,” अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. कामथ यांनी या पुस्तकाला १० पैकी ७.५ रेटिंग दिले आहे.
ट्रेडिंग गेम (लेखक: गॅरी स्टीव्हन्सन)
विमानतळावर असताना कामथ यांनी हे पुस्तक सहज विकत घेतले आणि प्रवासातच ते वाचून संपवले. हे पुस्तक मानवी गरजा आणि वेळेचे चक्र यावर भाष्य करते. कामथ यांच्या मते, माणसाला काल जे हवे होते ते उद्या कधीच पुरेसे वाटत नाही आणि उद्या त्याला जे हवे असते, ते अनेकदा त्याने मागे सोडलेल्या गोष्टीसारखेच असते. अर्थशास्त्रापेक्षा गोष्टीच्या रूपात असलेले हे पुस्तक अत्यंत खिळवून ठेवणारे आहे. त्यांनी याला ८/१० रेटिंग दिले आहे.
हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी (लेखक: बर्ट्रांड रसेल)
पाश्चात्य तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरल्याचे कामथ सांगतात. मानवी विचारांच्या विविध पैलूंचा यात आढावा घेतला आहे. फायनान्सच्या पलीकडे जाऊन मानवी स्वभाव आणि मानसशास्त्र समजून घेण्यासाठी याचा मोठा फायदा होतो. हे पुस्तक वाचायला खूप वेळ लागत असला, तरी माणसाच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. कामथ यांनी याला ८/१० रेटिंग दिले आहे.
ऑन ट्रुथ (लेखक: जे कृष्णमूर्ती)
महान भारतीय विचारवंत जे कृष्णमूर्ती यांचे हे पुस्तक सत्याचा शोध घेत नाही, तर सत्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करते, असे कामथ यांचे मत आहे. हे पुस्तक तुम्हाला आतून अस्वस्थ करते. परंतु, हेच याचे वैशिष्ट्य असून ते आपल्याला स्वतःच्याच विश्वासांवर पुन्हा विचार करण्यास भाग पाडते. कामथ यांनी याला ७.५/१० रेटिंग दिले आहे.
फ्रीडम फ्रॉम द नोन (लेखक: जे कृष्णमूर्ती)
जे कृष्णमूर्ती यांचे हे दुसरे पुस्तक निखिल कामथ यांचे ऑल टाईम फेव्हरेट आहे. हे पुस्तक त्यांनी आतापर्यंत किमान ५ वेळा वाचले आहे. ते म्हणातात “फ्रीडम फ्रॉम द नोन वाचताना मला प्रत्येक वेळी वेगळा अर्थ गवसला आहे. अवघ्या ३ तासांत एका बैठकीत वाचून संपणारे हे अत्यंत सोपे पण शक्तिशाली पुस्तक आहे. कामथ यांच्या मते, आपण ज्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतो ते आपले ‘पूर्वग्रह’ असतात. खऱ्या अर्थाने जग समजून घेण्यासाठी या पूर्वग्रहांच्या पलीकडे पाहणे गरजेचे आहे. कामथ यांनी या पुस्तकाला १० पैकी १० रेटिंग दिले असून, ते त्यांच्या वैयक्तिक टॉप १० पुस्तकांपैकी एक आहे.
ॲनिमल फार्म (लेखक: जॉर्ज ऑर्वेल)
‘ॲनिमल फार्म’ ही जॉर्ज ऑर्वेल यांनी लिहिलेली एक जगप्रसिद्ध राजकीय व्यंग्यात्मक कादंबरी आहे. जगातील आणि बाजारातील ‘चक्र’ समजून घेण्यासाठी हे एक अद्भूत पुस्तक आहे. “जे भूतकाळात घडले आहे, तेच पुन्हा पुन्हा घडत राहणार,” हा या पुस्तकाचा गाभा आहे. कामथ यांच्या मते, भविष्याचा अंदाज लावण्यापेक्षा भूतकाळाचा अभ्यास करणे जास्त महत्त्वाचे आहे. ॲनिमल फार्मला त्यांनी ९/१० रेटींग दिले.
व्हेन जीनिअस फेल्ड (लेखक: रॉजर लोवेनस्टाईन)
जागतिक बाजारातील एका मोठ्या घसरणीवर आधारित असलेल्या या पुस्तकातून कामथ यांनी एक सोपा नियम शिकला. “अनुभवाशिवाय असलेला सिद्धांत हा सिद्धांताशिवाय असलेल्या अनुभवापेक्षा कमकुवत असतो” जगातील सर्वात हुशार मेंदू एकत्र येऊनही गुंतवणुकीचे मॉडेल्स कसे अपयशी ठरू शकतात आणि सर्वकाही गमावू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. लोकांचा कोलाहल, मार्केटिंग आणि ब्रँडिंग बाजूला ठेवून केवळ मूळ उत्पादन किंवा कंपनीवर लक्ष केंद्रित करा, हा मोलाचा सल्ला कामत यांना यातून मिळाला. रेटिंग: ७/१०.
