नवी दिल्ली : आरोग्य विमा हा केंद्र सरकारने प्राधान्य क्षेत्र म्हणून निर्धारित केले असून, २०३३ पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला विम्याचे संरक्षण उपलब्ध होईल, असे लक्ष्य आपल्यापुढे असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना स्पष्ट केले.
विमा क्षेत्राचा विस्तार सुरू असून, २०२४-२५ या वर्षात या क्षेत्राने देशातील ५८ कोटी नागरिकांना विमा संरक्षण पुरवले आहे. आरोग्य विमा हा सरकारचा प्राधान्यक्रम आहे. किंबहुना, २०३३ पर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीला विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विचारलेल्या पूरक प्रश्नांना उत्तर देताना सीतारामन यांनी सांगितले.
डिसेंबर २०२५ मध्ये, विमा क्षेत्राचा विस्तार आणि व्याप्ती अधिक सखोल करण्याच्या उद्देशाने, सरकारने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक अर्थात ‘एफडीआय’ची मर्यादा वाढवणारे विधेयक सादर केले. ग्रामीण भागातील विमा व्याप्ती वाढवण्यासाठी, विमा नियामक संस्था असलेल्या ‘इर्डा’ने २०२४ मध्ये ग्रामीण सामाजिक क्षेत्र आणि ‘थर्ड-पार्टी’ (त्रयस्थ पक्ष) दायित्वांसंबंधीचे नियम अधिसूचित केले, असेही त्यांनी नमूद केले.
देशात प्रति-व्यक्ती विमा हप्ता (प्रीमियम) केवळ ९७ अमेरिकी डॉलर इतका असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले, तर जागतिक स्तरावर हे सरासरी प्रमाण ९४३ अमेरिकी डॉलर इतके आहे. विमा व्याप्तीचे प्रमाण अद्याप कमी असले तरी, सरकारने आखलेल्या ‘लक्ष्य-केंद्रित सुधारणा’ आणि ‘विमा परवडण्यायोग्य बनवण्यासाठीच्या उपाययोजनां’द्वारे ही तफावत भरून काढण्याचे काम सरकार सक्रियपणे करत आहे. वैयक्तिक आरोग्य विमा हप्त्यांवरील शून्य जीएसटी, विमा संरक्षणाचा विस्तार आणि नियामक यंत्रणेकडून मिळणारा भक्कम पाठिंबा यामुळे या क्षेत्राच्या प्रगतीला मोठी गती मिळाली आहे, असे अर्थमंत्री म्हणाल्या.
विमा क्षेत्राची बाजारपेठ
विमा क्षेत्राची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढली असून, २०२४-२५ या वर्षात या क्षेत्राची उलाढाल १,१७,५०५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या क्षेत्राद्वारे ५८ कोटी नागरिकांना विमा संरक्षण पुरवले जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या, आरोग्य विमा हप्त्यांच्या माध्यमातून, ४२,४२० कोटी रुपयांचे विमा संरक्षण पुरवतात; खासगी क्षेत्रातील कंपन्या ३७,७५२ कोटी रुपयांचे, तर केवळ आरोग्य विमा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्या ३७,३३१ कोटी रुपयांचे विमा संरक्षण पुरवत आहेत. केंद्र सरकारकडून ‘पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे, यात केवळ ४३६ रुपये प्रति वर्ष इतक्या माफक दरात २ लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण प्राप्त आहे.
