नवी दिल्ली : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया अगदी सुस्थितीत असून, इतर विकसनशील अर्थव्यवस्थांच्या तुलनेत देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती देखील भक्कम आहे, असा निर्वाळा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी दिला.

पश्चिम आशियातील युद्धामुळे रुपयाचे सातत्याने अवमूल्यन सुरू आहे. हा संघर्ष २८ फेब्रुवारीला सुरू झाला तेव्हापासून रूपयाच्या मूल्यात ४.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी (२७ मार्चला) ९४.८२ च्या पातळीवर बंद झाला होता. चालू आर्थिक वर्षात त्यात डॉलरच्या तुलनेत ९.९ टक्क्यांची घसरण झाली असून, रुपयासाठी गेल्या १४ वर्षांतील सर्वात आव्हानात्मक वर्ष ठरले आहे.

या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या पुरवणी प्रश्नावर लोकसभेत लेखी उत्तरात सीतारामन यांनी वरील निर्वाळा दिला. त्या म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत असून, संपूर्ण जगाकडून आपल्या वित्तीय शिस्तीचे कौतुक होत आहे. आपली परकीय चलन गंगाजळीही चांगली आहे. इतर विकसनशील अर्थव्यवस्थांच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ठीक पातळीवरच आहे.

केवळ रुपयाचेच अवमूल्यन झालेले नाही. पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून प्रमुख आशियाई चलनांचे अवमूल्यन झाले आहे. दक्षिण कोरियातील वॉन, थायलंडचे बात आणि फिलिपिन्सचे पेसो या चलनांचे रुपयापेक्षा किती तरी जास्त अवमूल्यन झाले आहे. डॉलरच्या तुलनेत वॉनचे अवमूल्यन ४.६ टक्के, बातचे अवमूल्यन ५.५ टक्के आणि पेसोचे अवमूल्यन ४.८ टक्के आहे, असेही सीतारामन यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले.

मागे ऑक्टोबर २०२२ मध्ये मूल्य वेगाने ढासळत असलेल्या रुपयाबद्दल अर्थमंत्र्यांना प्रश्न केला गेला असता, ‘रुपया गडगडत नाही, तर डॉलर मजबूत होत आहे’ असे त्यांनी उत्तर दिले होते. त्याच उत्तराची त्यांनी सद्य:स्थितीतही पुनरावृत्ती केली.

महागाईत घसरणीचा दावा

केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, रूपयाचे मूल्य बाजारपेठेतील मागणी-पुरवठ्याचे समीकरण ठरविते आणि त्यावर परिणाम करणारे अनेक घटक असतात. सरकार आणि रिझर्व्ह बँक रुपयाच्या मूल्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. देशातील महागाईत घट झाली असून, किरकोळ महागाईचा दर २०२०-२१ मध्ये ६.२ टक्के होता आणि २०२४-२५ मध्ये तो ४.६ टक्क्यांवर आला. हा दर चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत १.९ टक्के आहे. बहुतांश अत्यावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर आहेत अथवा त्यात घसरण होत आहे.