Nirmala Sitharaman Statement Tata Group Dispute: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी असे म्हटले की, टाटा समूहातील अंतर्गत वाद ही एक “नाजूक बाब” असून, संबंधित पक्षांनी ती “परस्पर सामंजस्याने” सोडवायला हवी. त्यांच्या या विधानानंतर मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी टाटा समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत आहेत.
१ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या आपल्या सलग १० व्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत ‘फायनान्शिअल एक्सप्रेस’चे संपादक श्यामल मजुमदार यांच्याशी संवाद साधताना सीतारामन म्हणाल्या की, अशा प्रकारचे वाद सार्वजनिक व्यासपीठावर चव्हाट्यावर येणे योग्य नाही आणि सरकारची अशी अपेक्षा आहे की, ही “परिस्थिती लवकरात लवकर निकाली निघावी.”
१५० वर्षांचा इतिहास असलेल्या टाटा समूहाची पालक कंपनी टाटा सन्सचा आयपीओ आणि कंपनीचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांचा विरोध आहे. १७ सप्टेंबर रोजी संचालक मंडळाने चंद्रशेखरन यांना आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था आणि टाटा समूह
या संवादादरम्यान निर्मला सीतारमण यांनी टाटा समूह भारतीय अर्थव्यवस्थेचा एक “महत्त्वाची घटक” असल्याचा उल्लेख केला, परंतु अशा प्रकरणांमध्ये सरकारने सहजासहजी हस्तक्षेप करू नये, असेही त्या म्हणाल्या. त्यांनी टाटा समूहाला जागतिक ब्रँड म्हणून घडवण्यात पारशी समुदायाने बजावलेल्या भूमिकेचेही कौतुक केले.
“परिस्थिती लवकर पूर्वपदावर यावी यासाठी त्यांनी आपापसात चर्चा करून प्रश्न सोडवायला हवेत. अशा गोष्टी अशा प्रकारे सार्वजनिक व्यासपीठावर येणे योग्य नाही. नेतृत्वाकडून ज्या परिपक्वतेची अपेक्षा असते, ती पाहता ही परिस्थिती लवकरात लवकर मार्गी लागावी अशी आमची इच्छा आहे”, असे सीतारामण म्हणाल्या.
टाटा समूहाचे शेअर्स वधारले
आज टाटा समूहातील प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचा शेअर जवळपास ३ टक्क्यांनी, टाटा मोटर्स पीव्हीचा शेअर सुमारे २ टक्क्यांनी आणि इंडियन हॉटेल्स कंपनीचा शेअर १.५ टक्क्याने वधारला. दुसरीकडे, टाटा एलक्सीच्या शेअरची किंमत ०.८ टक्क्यांनी घसरली, टाटा कम्युनिकेशन्सचा शेअर ०.६ टक्क्यांनी खाली आला आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व टाटा स्टीलच्या शेअर्समध्येही किंचित घसरण झाली.
