Nitin Gadkari MLFF Toll System: केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे ‘मल्टी-लेन फ्री फ्लो’ (MLFF) टोल प्रणालीचे उद्घाटन केले. ही नवीन प्रणाली ‘अर्बन एक्स्टेंशन रोड-II’ (UER-II) वरील मुंडका-बक्करवाला पट्ट्यावर कार्यान्वित करण्यात आली आहे.
या प्रणालीमुळे वाहनांना टोल नांक्यांवर एकही मिनिट वाया न घालवता पुढे जाता येते. परिणामी वाहनांच्या लांब रांगा, इंधनाचा अपव्यय आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होते. संपूर्ण भारतभर स्वयंचलित टोल संकलन प्रणाली लागू करण्याच्या सरकारच्या योजनेचाच एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नव्या टोल प्रणालीचे काम कसे चालते?
सामान्यपणे वाहनांना टोल नाक्यांवर वेग कमी करावा लागतो किंवा टोल गेटवर थांबावे लागते. पण, या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असलेल्या ‘MLFF’ प्रणालीमध्ये प्रगत कॅमेरे आणि डिजिटल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या प्रणालीद्वारे वाहने त्यांच्या नेहमीच्या वेगाने पुढे जाऊ शकतात आणि याचबरोबर टोल शुल्क आपोआप वसूल केले जाते. महामार्गावरील प्रवास अधिक सुरळीत आणि कार्यक्षम बनवणे, हे या तंत्रज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
गुजरातमध्ये सुरत-भरूच या एनएच-४८ महामार्गावरील चोऱ्यासी टोल नाक्यानंतर, देशातील अशा प्रकारची अडथळामुक्त (Barrier-less) प्रणाली असलेला ‘मुंडका-बक्करवाला’ हा असा दुसरा टोल नाका ठरला आहे. चोऱ्यासी टोल नाका या महिन्याच्या सुरुवातीलाच कार्यान्वित झाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२७ च्या सुरुवातीपर्यंत देशभरातील विविध राज्यांमधील आणखी अनेक टोल नाक्यांवर ही प्रणाली स्वीकारली जाण्याची अपेक्षा आहे.
देशव्यापी अंमलबजावणीचे नियोजन
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) चालू आर्थिक वर्षात देशभरातील अनेक टोल नाक्यांवर ‘MLFF’ प्रणालीचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या एका वृत्तानुसार, सप्टेंबर २०२६ पर्यंत विविध राज्यांमधील १७ टोल नाके ‘अडथळामुक्त’ (barrier-less) होण्याची अपेक्षा आहे. तसेच, पुढील टप्प्यात आणखी अनेक टोल नाक्यांचा यात समावेश करण्याचे नियोजन आहे.
भारत पूर्णपणे डिजिटल आणि अखंड टोल संकलन प्रणालीकडे वाटचाल करत असल्याने, २०२६ च्या अखेरीस प्रत्यक्ष टोल नाके हळूहळू संपुष्टात येऊ शकतात, असे संकेतही सरकारने दिले आहेत.
दिल्लीतील प्रवाशांना दिलासा
‘अर्बन एक्स्टेंशन रोड-II’ हा एक महत्त्वाचा मार्ग (कॉरिडॉर) आहे, ज्याची रचना वाहनांना शहराबाहेर वळवून दिल्लीतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. टोल नाक्यांवर होणारा विलंब कमी करून, ही ‘अडथळामुक्त टोल प्रणाली’ (barrier-less tolling system) या मार्गावरील प्रवास अधिकच सुलभ करेल, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे.
