Nitin Gadkari family Ethanol Business : देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापराला प्रोत्साहन देण्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आघाडीवर आहे. मात्र, इथेनॉलमुळे मायलेज कमी होणे आणि वाहने खराब होण्याच्या तक्रारी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये नितीन गडकरी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. गडकरी यांच्या मुलांची इथेनॉल उत्पादन कंपनी असून त्यांना लाभ मिळावा यासाठी ते इथेनॉलची वकिली करत असल्याचाही आरोप गडकरी यांच्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इथेनॉल निर्मितीत मुलांच्या कंपनीला किती लाभ झाला? यामध्ये किती नफा आहे? त्यांचा कुटुंबाच्या व्यवसायाशी काय संबंध आहे? यावर प्रतिक्रिया दिली आहे.

इथेनॉल निर्मितीतून गडकरी कुटुंबाला किती फायदा होतो?

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, त्यांच्या मुलांच्या व्यवसायाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. देशात इथेनॉलची चर्चा सुरू होण्यापूर्वीच त्यांचं कुटुंब साखर उत्पादन क्षेत्रात काम करत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या मुलांच्या कंपनीच्या एकूण उत्पन्नात इथेनॉलचा वाटा अत्यंत नगण्य आहे. उलट, त्यांच्या व्यवसायावर सुमारे १,६०० कोटी रुपयांचे मोठे कर्ज आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाने इथेनॉल निर्मितीतून पैसे कमावले किंवा मुलांच्या कंपनीला याचा फायदा होतोय, हा आरोप पूर्णपणे निराधार आहे.

इथेनॉलची किंमत कोण ठरवते?

गडकरी यांनी स्पष्ट केले की, ते स्वतः कोणताही कौटुंबिक व्यवसाय चालवत नाहीत. शिवाय इथेनॉलचे दर निश्चित करण्याच्या अथवा त्याच्या सरकारी खरेदी प्रक्रियेत त्यांची कोणतीही भूमिका नाही. इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे राबविला जात असून, त्याचे दर केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे निश्चित केले जातात. ते म्हणाले, “मी केवळ उसापासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलचा प्रचार करत नाही, तर मका, बांबू आणि अगदी पिकांच्या धसकटांपासून इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन देतो.”

नितीन गडकरी यांची मुले काय करतात?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दोन मुलगे आहेत. थोरले निखिल गडकरी आणि धाकटे सारंग गडकरी. त्यांचे इथेनॉल आणि साखर कारखान्यांचे व्यवसाय आहेत. ‘सियान ॲग्रो इंडस्ट्रीज’ आणि ‘मानस ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ अशी या कंपन्यांची नावे आहेत. दोन्ही मुले स्वतंत्रपणे हे व्यवसाय सांभाळतात.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे मायलेज कमी होते?

इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे मायलेज कमी होत असल्याच्या अनेक तक्रारी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यावर बोलताना नितीन गडकरी यांनी मान्य केलं, की इथेनॉलमुळे मायलेजमध्ये थोडा फरक पडत आहे. मात्र, भविष्यात किमतीमधील फरकाने तो वसूल होईल.