Nitin Kamath Zerodha Advice On Role Models: झिरोधा या ब्रोकिंग प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी प्रत्येक उद्योजकाला खेळाडू किंवा चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांप्रमाणे आदर्श मानणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) केलेल्या या पोस्टमध्ये कामथ यांनी उद्योजक, खेळाडू आणि अभिनेते यांना आदर्श मानण्यापेक्षा आणि त्यांच्याकडे सल्ले मागण्यापेक्षा जे खरोखरच पात्र लोक आहेत त्यांच्याकडून सल्ले घ्यावेत, असे आवाहन केले आहे.

नितीन कामथ आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हणाले, “जेव्हा लोक व्यावसायिकांना ‘रोल मॉडेल’ (आदर्श) मानतात तेव्हा मला ते जरा विचित्र वाटते. गेल्या साधारण पाच वर्षांत हे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. चित्रपटसृष्टीतील किंवा क्रीडा क्षेत्रातील तारे-तारकांना डोक्यावर घेण्याबाबतही हेच लागू होते. खरं तर, यापैकी काहीही व्हायला नको.”

सल्ल्यांबाबतचा आपला स्वतःचा अनुभव सांगताना नितीन कामथ म्हणाले, “जेव्हा लोक माझ्याकडे सल्ल्यासाठी येतात, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया हीच असते की, ‘मी यासाठी पात्र आहे असे तुम्हाला का वाटते? केवळ व्यवसायात मला नशिबाची साथ मिळाली, म्हणून मी तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल, आयुष्यातील निर्णयांबद्दल किंवा ‘नशीब कसे उजळवायचे’ याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टींबद्दल सल्ला देण्यास पात्र ठरतो का?'”

माझ्यापेक्षा कितीतरी अधिक हुशार

सल्ला देण्यासाठी खरोखरच कोण पात्र आहे याबाबत बोलताना कामथ म्हणाले, “असे अनेक स्टार्टअप संस्थापक आहेत, जे विशेषतः सामाजिक क्षेत्रात काम करतात. त्यांना मी @RainmatterOrg च्या माध्यमातून भेटतो. मला वाटते की सल्ला देण्याच्या बाबतीत ते माझ्यापेक्षा कितीतरी अधिक हुशार आणि सक्षम आहेत. जर तुम्हाला एखादे ‘रोल मॉडेल’ निवडायचेच असेल, तर अशा व्यक्तीची निवड करा ज्याच्याकडे खऱ्या आयुष्यात कौतुक करण्यासारखे गुण आहेत. केवळ जगासमोर ती व्यक्ती स्वतःला कसे सादर करते, यावरून त्यांची निवड करू नका.”

झिरोधा हा स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म चालवण्याबरोबरच नितीन कामथ सोशल मीडियावर सातत्याने विविध विषयांवर व्यक्त होत असतात. ते शेअर बाजारापासून, गुंतवणूक, करिअर आणि व्यावसायांपर्यंत अशा विषयांवर मार्गदर्शन करत असतात. झिरोधामध्ये नितीन कामथ उत्पादन, ब्रोकिंग आणि मनुष्यबळ विभाग हाताळतात. तर त्यांचे बंधू निखिल शेअर बाजार आणि गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतात.