Infosys Vice Chairman : आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे आव्हान पेलण्यासाठी भारतातील दिग्गज आयटी कंपनी नेतृत्वात मोठा बदल केला आहे. देशातील कॉर्पोरेट जगतातील अत्यंत अनुभवी व्यक्ती नितीन परांजपे यांची कंपनीच्या अकार्यकारी उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीने एआय आणि दीर्घकालीन धोरणात्मक नियोजनावर लक्ष केंद्रित केले असतानाच परांजपे यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इन्फोसिसने आयटी क्षेत्राऐवजी ‘कन्झ्युमर मार्केट’चा अनुभव असलेल्या नेत्याची निवड करणे ही एक मोठी स्ट्रॅटेजी मानली जाते.
नंदन निलेकणींना मिळणार भक्कम साथ
इन्फोसिसने स्पष्ट केले आहे की, परांजपे हे चेअरमन नंदन निलेकणी यांना बोर्डाचे मार्गदर्शन करण्यासाठी आणि कंपनीच्या धोरणात्मक अजेंडाला आकार देण्यासाठी सहकार्य करतील. दरम्यान, सध्या चेअरमन पदाच्या बदलाबाबत कोणताही विचार नसल्याचेही निलेकणी यांनी स्पष्ट केले आहे.
बहुआयामी नेतृत्व
नितीन परांजपे यांचा जागतिक ग्राहक व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव इन्फोसिसच्या नेतृत्वासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे. सध्या ते ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’चे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय ‘हाइनेकेन एन.व्ही’चे अकार्यकारी उपाध्यक्ष आणि ‘केदार कॅपिटल’मध्ये ऑपरेटिंग पार्टनर म्हणूनही ते आपली भूमिका बजावत आहेत.
युनिलिव्हरमधील ३७ वर्षांचा प्रवास
परांजपे यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९८७ मध्ये युनिलिव्हरमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून केली होती. तब्बल ३७ वर्षांच्या या प्रवासात त्यांनी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, चीफ पीपल अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर आणि अनेक जागतिक व्यावसायिक विभागांचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरचे सर्वात तरुण सीईओ होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.
पुण्यातून इंजिनिअरिंगचे शिक्षण
नितीन परांजपे यांचे शिक्षण पुण्यात झाले असून त्यांनी ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे’ येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. त्यानंतर मुंबईतील नामांकित ‘जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ मधून त्यांनी मार्केटिंगमध्ये एमबीए केले.
नोकरीतून मिळवली ४०० कोटींची संपत्ती
२०२६ च्या सुरुवातीच्या अहवालांनुसार, परांजपे यांची एकूण संपत्ती सुमारे ८० कोटी ते ४००+ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ही संपूर्ण सपत्ती त्यांनी केवळ नोकरीतून मिळवलेली आहे. यामध्ये वेतन, बोनस, स्टॉक-आधारित भरपाईचा समावेश आहे. दरम्यान, नवीन कंपनीत त्यांना किती पगार, भत्ते असेल? याबाबत माहिती समोर आलेली नाही.
इन्फोसिसच्या शेअरची घसरण
याच आठवड्यात इन्फोसिसने आपले तिमाही निकाल जाहीर केले. यात कंपनीला तब्बल ८००० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मात्र, भविष्यातील वाढीच्या अंदाजाने गुंतवणूकदार निराश झाले आहे. याचा परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाला. गेल्या वर्षभरात इन्फोसिसचा शेअर जवळपास २७ टक्के इतका कोसळला आहे.
