Paul Krugman on Donald Trump Crypto Income and its long-term damage to the US economy: प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पॉल क्रुगमन यांनी नुकतेच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाचा वापर करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतल्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीबद्दल सविस्तर भाष्य केले.
‘एमएस नाऊ’चे एरी मेलबर यांनी २००८ चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते क्रुगमन यांना विचारले की, “नैतिकतेचा मुद्दा बाजूला ठेवला, तर सरकार जर भ्रष्ट असेल किंवा एखाद्या गटाच्या नियंत्रणाखाली असेल, तर सामान्य जनतेला म्हणजेच आपल्यालात्याची काय किंमत मोजावी लागते?”
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सादर केलेल्या त्यांच्या नवीन आर्थिक माहितीनुसार, २०२५ मध्ये ट्रम्प यांचे उत्पन्न २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाले असून, त्यातील जवळपास १.४ अब्ज डॉलर्स क्रिप्टो कमाईतून आले आहेत.
यावर बोलताना क्रुगमन यांनी फिलिपिन्सचे हुकूमशहा फर्डिनांड मार्कोस यांच्या राजवटीतील ‘घनिष्ठ संबंधांवर आधारित भांडवलशाही’ या संकल्पनेकडे लक्ष वेधले आणि “तुम्हाला काय माहीत आहे यापेक्षा, तुम्ही कोणाला ओळखता हे महत्त्वाचे आहे”, या प्रचलित असलेल्या वाक्प्रचाराचा उल्लेख केला.
“यामध्ये व्यवसायातील यश हे योग्य ओळखी असण्यावर आणि नेता, सर्वोच्च नेता किंवा इतर कोणाची तरी मर्जी मिळवण्यावर अवलंबून असते आणि हे अत्यंत विनाशकारी आहे”, असे त्यांनी नमूद केले.

“याचा अर्थ असा की, व्यवसायांना मिळणारे सर्व प्रोत्साहन हे केवळ ‘मर्जी’ जपण्यासाठी असते, प्रत्यक्ष व्यवसायात चांगली कामगिरी करण्यासाठी नाही. परिस्थिती तेव्हा अधिकच वाईट बनते, जेव्हा ही मर्जी जपण्यासाठी केवळ राष्ट्राध्यक्षांचे कुटुंब आणि त्यांचे मित्र यांच्याकडे पैसा वळवण्यात कोण सर्वात पटाईत आहे, हेच निकष ठरतात”, असे ते पुढे म्हणाले.
क्रुगमन यांचे असे मत आहे की, ट्रम्प यांच्या कार्यकाळात उत्पादकता आणि प्रत्यक्ष आर्थिक मूल्यनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या आर्थिक नियम आणि परंपरांचा अचानक ऱ्हास झाला आहे. त्याऐवजी व्हाइट हाऊसला खुश ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे.
काय आहे प्रकरण?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांना २०२५ या आर्थिक वर्षात क्रिप्टोकरन्सी व्यवहारांतून सुमारे १.२ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळाले आहे. यावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रम्प म्हणाले, “मला नफा का होतोय हे तुम्हाला माहीत आहेच. शेअर बाजार वर जात आहे आणि त्यामुळे सर्वांनाच नफा होत आहे. मी माझ्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारांमध्ये लक्ष घालत नाही. माझ्या पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वीच मी खूप पैसा कमावला आहे. ते माझ्या पैशांची गुंतवणूक करतात आणि मी त्यांच्याशी त्याबाबत कोणतीही चर्चा करत नाही.”
