Noel Tata Citizenship Controversy : टाटांच्या धर्मादाय न्यासातील वादाने नवे वळण घेतले असून, ‘बाई हिराबाई जमसेटजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूट’च्या विश्वस्तपदी कायम राहण्याच्या नोएल टाटा यांच्या पात्रतेवर मेहली मिस्त्री यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नोएल यांच्याकडे आयर्लंडचे नागरिकत्व आणि संयुक्त अरब अमिरातीचा ‘गोल्डन व्हिसा’ असून ते तेथील करनिवासी असल्याचा आरोप मिस्त्री यांनी केला आहे.
बृहन्मुंबई विभागाच्या धर्मादाय उपायुक्तांसमोर दाखल केलेल्या प्रत्युत्तरात मिस्त्री यांनी नोएल टाटा यांच्याकडून प्रतिज्ञापत्राची मागणी केली आहे. या प्रतिज्ञापत्राद्वारे नोएल टाटा यांनी विश्वस्तपदी नियुक्ती झाली त्यावेळचे नागरिकत्व, त्यानंतर नागरिकत्वात झालेल्या कथित बदलाची पार्श्वभूमी आणि सध्याचा करनिवासाचा दर्जा स्पष्ट करावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
नोएल टाटा यांच्या नागरिकत्वाला मिस्त्री यांनी आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नोएल टाटा हे स्वत:ला आयरिश नागरिक मानतात आणि त्यांच्याकडे संयुक्त अरब अमिरातीचा गोल्डन व्हिसा आहे. त्यामुळे ट्रस्ट्सवर नियुक्तीच्या वेळी ते भारतीय होते की आयरिश याबद्दल त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे. तसेच, त्यांचे नागरिकत्व बदलले आहे का आणि ते संयुक्त अरब अमिरातीचे करदाते आहेत का, याचेही उत्तर त्यांनी द्यावे.
श्रीनिवासन यांच्या मताच्या वैधतेला आव्हान
टाटा ट्रस्ट्सचे विश्वस्त म्हणून टीव्हीएस समूहाचे वेणू श्रीनिवासन यांच्या मताच्या वैधतेला मिस्त्री यांनी आव्हान दिले आहे. टाटा ट्रस्ट्समधील श्रीनिवासन यांचा कार्यकाळ २३ ऑक्टोबरला संपुष्टात आला. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांनी ट्रस्ट्सच्या ठरावावर मतदान केले, असा आरोप मिस्त्री यांनी केला आहे. श्रीनिवास यांचे मत अवैध असल्याने संबंधित ठरावालाही मिस्त्री यांनी आव्हान दिले आहे.
