Noel Tata Retirement : टाटा समूहात आगामी काळात मोठे नेतृत्व बदल पाहायला मिळणार आहे. टाटा समूहाचे प्रमुख आणि टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा नोव्हेंबर २०२६ मध्ये समूहातील ६ महत्त्वाच्या कंपन्यांच्या संचालक मंडळावरून पायउतार होणार आहेत. अकार्यकारी संचालकांसाठी असलेल्या निवृत्ती धोरणानुसार वयाची ७० वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांना या पदावर राहता येत नाही. यातील रिटेल क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘ट्रेंट लिमिटेड’च्या अध्यक्ष आणि संचालकपदावरून नोएल टाटा हे येत्या ११ नोव्हेंबर २०२६ रोजी निवृत्त होणार आहेत. ट्रेंट लिमिटेडने गुरुवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीद्वारे ही घोषणा केली. त्याचवेळी नवीन उत्तराधिकाऱ्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
२९ वर्षांचा यशस्वी प्रवास
झुडिओ, वेस्टसाईड असे लोकप्रिय ब्रँड तयार करणाऱ्या ट्रेंट लिमिटेडच्या यशात नोएल टाटा यांचा सिंहाचा वाटा आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “नोएल टाटा यांच्या कुशल नेतृत्वाखाली कंपनीने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले, बाजारातील आपले स्थान मजबूत केले. गेल्या २९ वर्षांतील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल संचालक मंडळ त्यांचे मनःपूर्वक आभार मानते.”
गुरुवारी ‘ट्रेंट’च्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर दिलेल्या संदेशात टाटा म्हणाले, “ट्रेंटच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असताना, कंपनीने अलिकडच्या वर्षांत जी मोठी प्रगती केली आहे, ती पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. फॅशन क्षेत्रात अगदी नव्याने प्रवेश करणाऱ्या कंपनीपासून ते या क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी बनण्यापर्यंतचा ट्रेंटचा प्रवास जवळून पाहणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.”
बहराम वकील नवीन अध्यक्ष
नोएल टाटा यांच्या निवृत्तीनंतर बहराम वकील १२ नोव्हेंबरपासून ट्रेंट लिमिटेडच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील, असा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यासोबतच ऑटोमोबाईल, रिटेल आणि विविध उद्योगांचा चार दशकांपेक्षा जास्त अनुभव असलेले राजीव दुबे यांची नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुबे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टाटा मोटर्समधून केली होती. त्यानंतर त्यांनी आदित्य बिर्ला ग्रुपच्या बोर्डावर काम केले आहे.
कल्पना मर्चंट यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती
४५ वर्षांहून अधिक कायदेशीर क्षेत्राचा अनुभव असलेल्या कल्पना मर्चंट यांची ३० ऑक्टोबर २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी कांगा अँड कंपनी, AZB अँड पार्टनर यांसारख्या नामवंत लॉ फर्म्ससोबत काम केले आहे.
