मुंबई: रिझर्व्ह बँकेने अनिवासी भारतीयांच्या परदेशी चलनातील ‘एफसीएनआर-बी’ ठेवी, परदेशातून घेतलेले विदेशी चलनातील कर्ज (ओएफसीबी) आणि बाह्य व्यावसायिक कर्ज (ईसीबी) यांच्यासाठी सुरू केलेल्या विशेष ‘डॉलर-रुपया फॉरेक्स स्वॅप’ सुविधेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या सुविधेअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत एकूण १३६.३७ अब्ज डॉलर विदेशी चलनाची अर्थात भारतीय रुपयात १२.८७ लाख कोटी रुपयांची उभारणी झाली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने बुधवारी दिली.
रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, या एकूण निधी उभारणीत ‘एफसीएनआर-बी’ ठेवींचा वाटा १२७.२२ अब्ज डॉलर (सुमारे १२ लाख कोटी) इतका आहे. ‘एफसीएनआर-बी’ ठेवी आकर्षित करणाऱ्या विशेष योजनेमुळे बँकांकडील डॉलरमधील ठेवींमध्ये आश्वासक वाढ दिसली आहे. या ठेवी जमा करण्यासाठी बँकांनी आकर्षक व्याजदर देऊ केले होते. त्यामुळे अनिवासी भारतीयांनी देशाच्या बँकिंग व्यवस्थेत डॉलरच्या स्वरूपात निधी जमा करण्यास मोठा प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण परकीय चलन प्रवाहात ‘ओएफसीबी’च्या माध्यमातून ५.२६ अब्ज डॉलर, तर ‘ईसीबी’च्या माध्यमातून ३.८९१ अब्ज डॉलर जमा झाले आहे.
यामुळे या विशेष सुविधेअंतर्गत भारतात आलेला एकूण निधी १३६.३७७ अब्ज डॉलरवर पोहोचला. मात्र, ईसीबी आणि ओएफसीबीसाठी ‘स्वॅप’ योजना मात्र पूर्वीप्रमाणेच ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत खुली राहणार आहे.
रुपयावरील ताण कमी करण्यासाठी योजना
डॉलरच्या तुलनेत रुपयावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि देशात विदेशी चलनाचा प्रवाह वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ही विशेष ‘स्वॅप सुविधा’ सुरू केली होती. जागतिक पातळीवरील आर्थिक आणि वित्तीय परिस्थिती आव्हानात्मक असताना देशाच्या परकीय चलनाच्या स्थितीला बळकटी देण्याचा उद्देश असलेली ही योजना ८ जून २०२६ रोजी सुरू करण्यात आली. मात्र या योजनेचा उद्देश वेळेआधीच साध्य झाल्यामुळे, रिझर्व्ह बँकेने ‘एफसीएनआर-बी’ ठेवी सुविधा बंद करण्याची तारीख ३० सप्टेंबरवरून, एक महिना आधीच ३१ ऑगस्ट अशी निश्चित केली.
