Oil India Ltd Share : पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव १०७ डॉलर्सच्या पार पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत आपल्या गरजेच्या ८० टक्के कच्चे तेल बाहेरुन आयात करणाऱ्या भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. देशाची ‘महारत्न’ कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडने परदेशात मोठा पराक्रम केला आहे. लिबियात कंपनीने तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा शोधला आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, लिबियाच्या नॅशनल ऑईल कॉर्पोरेशनने या नव्या शोधाला अधिकृत मान्यता दिली असून, या क्षेत्रात हायड्रोकार्बनची मोठी क्षमता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घडामेस खोऱ्यात शोधले काळे सोने!
हा ब्लॉक लिबियाच्या नैऋत्य भागात घडामेस खोरे या तेलसमृद्ध क्षेत्रात येतो. या संपूर्ण ब्लॉकचा विस्तार ६,६३० वर्ग किलोमीटर आहे. या प्रकल्पात ऑयल इंडियाची २५ टक्के हिस्सेदारी असून, कंपनी एका भारतीय कन्सोर्टियमचा भाग आहे, ज्यामध्ये आयओसीएल देखील सामील आहे.
नवीन विहिरीत तेल आणि गॅसचा साठा
या क्षेत्रात एकूण ८ शोध विहिरी खोदण्याचे नियोजन आहे. २०१२ ते २०१४ दरम्यान पाच विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले होते, ज्यापैकी चार विहिरींमध्ये तेल सापडले आहे. उपक्रम पुन्हा सुरू झाल्यानंतर सहाव्या विहिरीची ड्रिलिंग करण्यात आली, ज्यात पाचव्यांदा तेल आणि वायूचा मोठा साठा हाती लागला आहे.
ऑइल इंडियासाठी या शोधाचे महत्त्व
या यशा मुळे कंपनीच्या परदेशातील संपत्तीचे मूल्य वाढणार आहे. व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यास कंपनीच्या महसुलात मोठी भर पडेल. भारत केवळ आयातीवर अवलंबून न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनातही स्वतःचे स्थान निर्माण करत असल्याचे हे लक्षण आहे.
गुंतवणूकदारांसाठी काय संकेत?
ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांसाठी नवीन साठे सापडणे हे नेहमीच सकारात्मक मानले जाते. या बातमीमुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ‘ऑइल इंडिया’च्या शेअर्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होऊ शकतो. प्रत्यक्ष उत्पादनाची किंमत आणि व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्यासाठी पुढील काही महिने महत्त्वाचे असतील.
‘ऑइल इंडिया’च्या शेअर्सची कामगिरी
‘ऑइल इंडिया’चा शेअर्स सध्या दमदार कामगिरी करत आहे. मागील एका महिन्यात किरकोळ घसरण झाली असली तरी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना २० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सध्या शेअर ४७६.२० रुपयांवर व्यवहार करत असून हिरव्या रंगात बंद झाला आहे. तज्ज्ञांनी याला खेरदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीची कामगिरी पाहिली तर दीर्घकाळात चांगला नफा मिळवूण देण्याची क्षमता या शेअरमध्ये पाहायला मिळते.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.
