Old Monk Sale Resume Date: ओल्ड मॉन्क रम ब्रँडची मूळ कंपनी मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर ब्रुअरीजने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) लादलेल्या विक्रीबंदीला आव्हान देणारी मुंबई उच्च न्यायालयातील आपली याचिका मागे घेतली आहे.

‘एफएसएआय’ने ओल्ड मॉन्कच्या काही विशिष्ट प्रकारांवर वापरल्या जाणाऱ्या लेबल्स आणि उत्पादनाच्या वर्णनांवर आक्षेप घेतला होता. ‘एफएसएआय’ने म्हटले होते की, या उत्पादनांमध्ये फ्लेवर्सचा अतिरिक्त वापर असल्याने, त्यांना ‘रम’ ऐवजी ‘रम-फ्लेवर्ड स्पिरिट’ असे लेबल लावून विकले पाहिजे. याचबरोबर ‘एफएसएआय’ने ‘सेव्हन इयर्स ओल्ड ब्लेंडेड’ आणि ‘व्हेरी ओल्ड व्हॅटेड’ यांसारख्या लेबलवरील दाव्यांवरही चिंता व्यक्त केली होती.

‘एफएसएआय’च्या मते, हे उत्पादन प्रामुख्याने न्यूट्रल अल्कोहोल वापरून तयार केले गेले होते आणि त्यात नैसर्गिक किंवा कृत्रिम फ्लेवर्स मिसळले होते. याचा अर्थ अन्न सुरक्षा आणि मानके (मद्ययुक्त पेये) नियमांनुसार, पॅकेजिंगवर ‘रम-फ्लेवर्ड स्पिरिट’ म्हणून कायदेशीररित्या उल्लेख करणे आवश्यक आहे.

‘एफएसएआय’ने कंपनीच्या खोपोली प्रकल्पात उत्पादित होणाऱ्या ‘ओल्ड मॉन्क’ (Old Monk) च्या अनेक उत्पादनांच्या विक्रीवर आणि वितरणावर बंदी घातली होती.

ओल्ड मॉन्कची विक्री कधीपासून?

आज मुख्य न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान, कंपनीने न्यायालयाला सांगितले की, ते आपल्या उत्पादनांवरील लेबल्समध्ये सुधारणा करतील आणि मंजुरीसाठी ती ‘एफएसएआय’कडे सादर करतील.

यापूर्वी मद्य उत्पादक कंपनीने असा युक्तिवाद केला होता की, विक्रीवरील या निर्बंधांमुळे महाराष्ट्र सरकारचे उत्पादन शुल्कापोटी ३५० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. मात्र, न्यायालयाने ‘एफएसएआय’च्या आदेशाविरुद्ध अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर, कंपनीने आपली याचिका मागे घेतली. त्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढले.