वृत्तसंस्था, व्हिएन्ना
होर्मूझच्या सामुद्रधुनीतून मालवाहतूक पुन्हा सुरू झाल्याने खनिज तेल उत्पादक देशांची शक्तिशाली संघटना ‘ओपेक प्लस’ने येत्या ऑगस्टपासून उत्पादनात प्रति दिन १ लाख ८८ हजार पिंपांनी वाढ करण्यास सहमती दर्शविली आहे. यामुळे जगभरात पुरवठा लक्षणीय वाढणार असल्याने, खनिज तेलाच्या किमतीत सोमवारी एका डॉलरहून अधिक घसरण झाली आणि ते आणखी नरमण्याची शक्यता आहे.
खनिज तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ आणि रशियासह इतर संलग्न देशांनी उत्पादनात ऑगस्टपासून दररोज १ लाख ८८ हजार पिंपांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोमवारी खनिज तेलाची किंमत प्रति पिंप १.०२ डॉलर म्हणजेच १.४१ टक्क्याने घसरून ७१.१० डॉलरवर आली. मागील काही आठवड्यांत खनिज तेलाच्या किमतीत घसरण सुरू होती. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेवर होर्मूझच्या सामुद्रधुनीतून तेलाचा पुरवठा पूर्ववत होणे अवलंबून आहे. यामुळे निर्यातदारांनी सावध पवित्रा घेतल्याने गेल्या आठवड्यात खनिज तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नव्हता.
ओपेक आणि संलग्न देशांनी खनिज तेल उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाचे भविष्य अमेरिका, इस्रायलच्या इराण विरोधातील युद्धावर अवलंबून असेल. कारण इराणने ओपेकमधील महत्त्वाच्या देशांसाठी होर्मूझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यात सौदी अरेबिया, कुवेत, इराण या देशांचा समावेश आहे. आखाती देशांतून खनिज तेलाची निर्यात मेमध्ये दररोज ३० लाख पिंपे होती. ती वाढून जूनमध्ये दररोज १ कोटी पिंपांवर पोहोचली आहे. मात्र, ही निर्यात युद्धाच्या आधीपेक्षा अद्याप ४० टक्क्यांनी कमी आहे.
युक्रेन युद्धाचा परिणाम
रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम आगामी काळात खनिज तेलाच्या पुरवठ्यावर दिसून येणार आहे. युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यात रशियातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांची हानी झालेली आहे. यामुळे रशियाकडून खनिज तेलाच्या निर्यातीत तातडीने वाढ होणे शक्य नाही. रशियाची निर्यात जुलैमध्ये जूनएवढीच राहील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
‘यूईए’कडून सवलतीत विक्री
संयुक्त अरब अमिरातीतील (यूईए) सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी ‘अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनी’ने आपल्या पाचव्या जाहीर लिलावात तब्बल १ कोटी ६० लाख पिंप खनिज तेल विकले आहे. पण महत्त्वाचे म्हणजे हे तेल विकण्यासाठी कंपनीला जास्त सवलत म्हणजेच मोठी सूट द्यावी लागली. तेल विकले जावे म्हणून किंमती कमी करून (सवलत वाढवून) ते विकावे लागणे हे बाजारात मूळात मागणी मंदावणे किंवा पुरवठा जास्त असल्याचे लक्षण विश्लेषकांनी सूचित केले आहे.
