Oracle appoints Hillary Maxon as CFO with a massive salary package during global workforce reduction : ओरॅकलने सोमवारी हिलरी मॅक्सन यांची कंपनीच्या नवीन चीफ फायनान्शियल ऑफिसर (CFO) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली आहे. कंपनीने नुकतेच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते, ज्याचा फटका जगभरातील जवळपास ३० हजार कर्मचाऱ्यांना बसणार आहे. यादरम्यान ही नियुक्ती करण्यात आली आहे.

स्नेइडर इलेक्ट्रिक (Schneider Electric) या कंपनीतून मॅक्सन या ओरॅकल मधील जबाबदारी स्वीकारणार आहेत. पूर्वीच्या कंपनीत त्या सीएफओ आणि एक्झिक्युटीव्ह व्हाईस प्रेसिडेंट म्हणून जवळपास सहा वर्ष कार्यरत होत्या. ओरॅकलने दिलेल्या माहितीनुसार मॅक्सन यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने करण्यात आली आहे.

कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, कंपनीची झपाट्याने वाढ होत असताना तसेच कंपनीच्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असताना मॅक्सन या हे पद सांभाळत आहेत. मॅक्सन या कंपनीचे सीईओ क्ले मॅग्युर्क (Clay Magouyrk) यांच्या नेतृत्वाखाली काम करतील.

पगार किती मिळणार

ओरॅकलने नियुक्त केलेल्या ४८ वर्षीय सीएफओ मॅक्सन यांना वर्षाला मूळ वेतन हे ९५०००० डॉलर्स इतके मिळेल, याबरोबरच त्यांना कामगिरीवर आधारीत बोनस हा २.५ दशलक्ष डॉलर्स इतका असेल, अशी माहिती रेग्युलेटरी फायलिंग्जमधून समोर आली आहे. इतकेच नाही तर, ओरॅकल कंपनी मॅक्सन यांचा १२ महिन्यांपर्यंतचा नवीन ठिकाणी स्थलांतरित होण्याचा खर्च देखील देईल.

मॅक्सन यांच्या कम्पेन्सेशन पॅकेजमध्ये २६ दशलक्ष डॉलर्सच्या इक्विटी अवॉर्ड्सचा समावेश आहे, ज्यामध्ये ८० टक्के (२०.८ दशलक्ष डॉलर्स) हे टाइम-बेस्ड-व्हेस्टिंग आणि २० टक्के (५.२ दशलक्ष डॉलर्स) हे कामगिरीशी संबंधित आहेत. त्यांना १०० टक्के स्टॉक ऑप्शन्स किंवा ५० टक्के स्टॉक ऑप्शन आणि ५० टक्के रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्स (RSUs) यापैकी निवड करता येईल.

पार्श्वभूमी काय आहे?

मॅक्सन यांनी कॉर्नेल विद्यापीठातून पदवी आणि एमबीए दोन्ही केलेले आहे, तसेच त्यांनी नॉन-एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर आणि ऑडिट कमिटीच्या सदस्य म्हणून अँग्लो अमेरिकन पीएलसी येथे काम केले आहे. ऑरॅकलच्या आधी त्या स्नेइडर इलेक्ट्रिक या कंपनीत एक्झिक्युटीव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि ग्रूप सीएफओ म्हणून काम करत होत्या.

आपल्या करिअरच्या सुरूवातीला मॅक्सन यांनी एईस कॉर्पोरेशनमध्ये एका दशकाहून अधिक काळ वरिष्ठ पदांवर काम केले आहे. ज्यामध्ये त्यांनी फायनान्स, स्ट्रॅटेजी, मर्जर, विकत घेणे, तसेच जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांमध्ये केली जाणारी गुंतवणूक अशा वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत.

ओरॅकल कंपनीत मॅक्सन या आता प्रिन्सिपल फायनान्शियल ऑफिसर म्हणून डग केहरिंग यांची जागा घेतील, तर डग हे एक्झिक्युटीव्ह व्हाइस प्रेसिडेंट ऑफ ऑपरेशन म्हणून काम करत राहातील.

ओरॅकलमधील मोठ्या प्रमाणात कपात झाल्यानंतर हा नेतृत्व बदल झाला आहे, ज्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कंपनीने अधिकृतपणे नोकरकपातीचा नेमका आकडा जाहीर केला नसला तरी, जगभरातील ३० हजारहून अधिक कर्मचारी यामुळे प्रभावित झाल्याचे समोर आले आहे.

ओरॅकलमध्ये मे २०२५ पर्यंत जवळपास १६२००० इतके पूर्णवेळ काम करणारे कर्मचारी होते, अशी माहिती कंपनीच्या ताज्या १०-के फायलिंगमधून समोर आली आहे. मार्च महिन्यातील फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२६ साठी रीस्ट्रक्चरिंग खर्च हा २.१ अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या खर्चाचा मोठा हिस्सा प्रामुख्याने कर्मचाऱ्यांचा सेव्हरन्स आणि त्यासंबंधित खर्चासाठी राखून ठेवण्यात आला आहे.