Oracle layoffs 2026 update : ओरॅकल या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीने गेल्या आठवड्यात तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले. यामध्ये १२ हजार भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अलीकडच्या काळातील तंत्रज्ञान क्षेत्रातील ही सर्वात मोठी कपात ठरली आहे. ओरॅकलच्या नोकरकपातीमुळे आयटी क्षेत्रातील आव्हाने आता स्पष्ट होऊ लागली आहेत.

३१ मार्च रोजी सकाळी ६ वाजता एक इमेल पाठवून सर्व प्रभावित कर्मचाऱ्यांना कामावरून मुक्त करण्यात आले. त्या इमेलमध्ये म्हटले होते की, “व्यापक संघटनात्मक बदलाचा भाग म्हणून आम्ही तुमची भूमिका (role) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, आजचा दिवस तुमचा कामाचा शेवटचा दिवस आहे.” कंपनीने कर्मचारी कपातीची टक्केवारी किंवा नेमकी संख्या जाहीर केली नसली तरी, प्रभावित कर्मचाऱ्यांनी त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच अचाकनपणे नोकरीवरून कमी केल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांकरता सेव्हरन्स पे प्लानची मुभा देण्यात आली आहे.

ओरॅकल इंडियाच्या ‘सेव्हरन्स पे’चे स्पष्टीकरण

ओरॅकलमधील कर्मचारी कपातीच्या बातमीने जगभर खळबळ उडाली. अनेक कर्मचाऱ्यांनी ‘r/employeesofOracle’ या रेडिट थ्रेडचा वापर करून भारतातील सेव्हरन्स पॅकेज नेमके कसे आहे, याची माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्स आणि रेडिट पोस्ट्सनुसार, सेव्हरन्स पे ची गणना सेवा काळ (tenure), मूळ पगार आणि सानुग्रह अनुदान (ex gratia) यांसारख्या घटकांवर आधारित आहे. मात्र, पूर्ण रक्कम मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतात.

/Lavishness897′ या रेडिट वापरकर्त्याने बेंगळुरू येथील ओरॅकल इंडिया डेव्हलपमेंट सेंटर (IDC) मध्ये ऑफर केलेल्या सेव्हरन्स पॅकेजचा तपशील दिला आहे. त्यांनी म्हटलंय, १५ दिवसांचा मूळ पगार (बहुधा प्रत्येक सेवा वर्षासाठी) आणि न वापरलेल्या सुट्ट्यांचे पैसे दिले जातात. सानुग्रह अनुदानामध्ये (Ex gratia) दरवर्षीच्या सेवेसाठी अतिरिक्त १५ दिवसांचा पगार आणि अतिरिक्त निश्चित २ महिन्यांचा पगार समाविष्ट असेल. कर्मचाऱ्यांना १ महिन्याचा “गार्डनिंग लीव्ह” (gardening leave) पगार देखील मिळेल, याचा अर्थ कर्मचाऱ्यांना कामावर न येता नोटीस पिरियडचा पगार दिला जाईल. तसंच, कर्मचाऱ्यांना विम्यासाठी २०,००० रुपये मिळतील.

जर ही माहिती अचूक असेल, तर भारतीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचे पैसे आणि सेवा काळाशी संबंधित फायद्यांसह एकूण साधारणपणे साडेतीन महिन्यांचा मोबदला मिळेल. मात्र, अंतिम रक्कम कर्मचाऱ्याचे पद आणि कंपनीतील अनुभवावर अवलंबून असू शकते. त्या तुलनेत, अमेरिकेतील कर्मचाऱ्यांसाठी ओरॅकलचा सेव्हरन्स पे थोडा वेगळा आहे. एका रेडिट पोस्टनुसार, तेथील कर्मचाऱ्यांना पहिल्या वर्षाच्या सेवेसाठी ४ आठवड्यांचा मूळ पगार मिळेल. त्यानंतरच्या प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी १ जादा आठवड्याचा पगार दिला जाईल. मात्र, याची कमाल मर्यादा २६ आठवडे (सुमारे ६ महिने) इतकी आहे.