Global Tech Layoffs : जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात २०२६ हे वर्ष नोकरदार वर्गासाठी भयानक स्वप्नासारखे जात आहे. चालू वर्षाच्या पहिल्या ५ महिन्यात जगभरातील विविध कंपन्यांमधील १ लाखांपेक्षा जास्त तरुणांनी आपला रोजगार गमावला आहे. यामध्ये मेटा, क्लाउडफ्लेअर, लिंक्डइन आणि सिस्को यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या नोकरकपातीमागे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हे सर्वात मोठे कारण असून कंपन्या आपले व्यवसाय मॉडेल आणि गुंतवणूक योजना पूर्णपणे बदलत आहेत.
मे महिन्यात तब्बल २८,००० कर्मचारी बेरोजगार
‘Layoffs.fyi’ या नोकरकपातीची माहिती देणाऱ्या जागतिक वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार, एकट्या मे २०२६ मध्ये २८,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. आगामी काळात आणखी किती कर्मचाऱ्यांचा बळी जाणार या धास्तीने कर्मचारी मानसिक तणावात आहेत.
कोणत्या कंपनीने किती कर्मचारी कामावरुन काढले
फेसबुक आणि इंन्स्ट्राग्रामची मूळ कंपनी मेटाने आपल्या एकूण जागतिक कर्मचाऱ्यांपैकी तब्बल १०% कर्मचाऱ्यांची म्हणजेच सुमारे ८,००० जणांची कपाती केली आहे. यासोबतच, मेटाने आपल्या ऑटोमेशन आणि नेक्स्ट जनरेशन डिजिटल उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ७,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना थेट ‘एआय आधारीत’ प्रकल्पांवर शिफ्ट केले आहे. पेपलने मे महिन्यात ४,७६० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एआय तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी कंपनी आगामी २ ते ३ वर्षांत आपल्या एकूण मनुष्यबळात आणखी २०% कपात करू शकते, असे संकेत मिळाले आहेत.
सिस्कोने ४,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. सिस्कोचे मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स यांनी सांगितले, “एआय युगात त्याच कंपन्या टिकतील आणि जिंकतील, ज्या पूर्ण लक्ष केंद्रित करून दीर्घकालीन मागणी असलेल्या क्षेत्रांत आपली गुंतवणूक सातत्याने वळवतील.” अमेरिकेतील आघाडीची फायनान्शियल सॉफ्टवेअर कंपनी ‘इन्ट्युइट’ने जागतिक पातळीवर ३,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.
प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनने आपल्या ऑपरेशन्सचे सुलभीकरण आणि एआय उत्पादनांवर भर देण्यासाठी ८७५ कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. तर दुसरीकडे, क्लाउडफ्लेअरने संस्थेअंतर्गत वाढत्या एआय वापराचे कारण देत जगभरात १,१०० हून अधिक पदे रद्द केली आहेत. २५ मे रोजी ‘विक्स’ या कंपनीने आपल्या २०% कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली, ज्याचा फटका १,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना बसला.
या कंपन्यांव्यतिरिक्त तिकीटमास्टर, झूमइन्फो, अड्डा२४७, बिल.कॉम, आर्क्टिक वोल्फ, अपवर्क आणि ट्रूकॉलर या कंपन्यांनीही मे महिन्यात कर्मचारी कपातीची अधिकृत घोषणा केली आहे.
