Pakistan Oil Gas Discovery : इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका शेजारी राष्ट्र पाकिस्तानला बसला आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने आधीच खिळखिळी झालेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता डबघाईला आली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला आता बंपर लॉटरी लागली आहे. पाकिस्तानची सरकारी तेल आणि गॅस कंपनी ‘ऑइल अँड डेव्हलपमेंट लिमिटेड’ म्हणजेच ओजीडीसीएलला देशातील दक्षिण सिंध प्रांताच कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. या ऐतिहासिक शोधानंतर ओजीडीसीएल कंपनीने तात्काळ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज आणि लंडन स्टॉक एक्सचेंजला अधिकृत पत्र पाठवून आपल्या भागधारकांना आणि जागतिक बाजाराला या महत्त्वपूर्ण यशाची माहिती दिली आहे.
कुठे मिळाले तेलाचे साठे?
अहवालानुसार, हा नवा नैसर्गिक खजाना सिंध प्रांतातील संघर जिल्ह्यातील ‘बोबी आणि धमराका’ माइनिंग लीज क्षेत्रात सापडला आहे. ओजीडीसीएल कंपनीने आपल्याच अंतर्गत तांत्रिक आणि ऑपरेशनल इंजिनिअर्सच्या मदतीने ‘बोबी डीप-१’ नावाच्या एका शोध विहिरीचे खणण सुरू केलं होती. कंपनीने ३ मे रोजी या विहिरीची सुमारे ३३०५ मीटर इतकी ड्रिलिंग पूर्ण केले. ही संपूर्ण ड्रिलिंग प्रक्रिया ‘सेमबार फॉर्मेशन’ अंतर्गत करण्यात आली होती, जिथे शेवटी तेल आणि वायूचा हा मोठा साठा मिळून आला.
दररोज साधारण २००० बॅरल कच्चे तेल मिळणार?
या नव्या विहिरीतून दररोज साधारण २००० बॅरल कच्चे तेलाचे उत्पादन करण्याची अपेक्षा आहे. या तेलासोबतच तिथून दररोज ११ लाख स्टँडर्ड क्युबिक फीट नैसर्गिक वायूचेही उत्पादन केले जाईल. विशेष म्हणजे या संपूर्ण खाण क्षेत्राची १०० टक्के मालकी ओजीडीसीएल या सरकारी कंपनीची आहे. ज्यामुळे या खजिन्यातून मिळणारा अफाट पैसा आता सरकारी तिजोरी भरणार आहे.
पाकिस्तानात मोठे नैसर्गिक साठे?
पाकिस्तानात मोठे तेल आणि वायू साठे असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून आहे. पहिल्यांदाच याचा पुरावा मिळाला आहे. कंपनीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, या क्षेत्रात हायड्रोकार्बनचा शोध लागण्याची ही पहिलीच वेळ असून, हा देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरेल. या यशामुळे केवळ एक नवा संशोधनाचा मार्गच खुला झालेला नाही, तर आसपासच्या इतर क्षेत्रांमध्येही तेल आणि वायू मिळण्याची शक्यता वाढली आहे.
पाकिस्तानसाठी लॉटरी का?
पाकिस्तान आपल्या उर्जेची गरज भागवण्यासाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्याने पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा प्रचंड कमी झाला आहे. परिणामी प्रत्येकवेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संस्थांसमोर वारंवार कर्जासाठी हात पसरवावे लागतात. अशा अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीत देशांतर्गत पातळीवरच तेल आणि वायूचा साठी सापडणे हे पाकिस्तानच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
