Petrol Diesel Price Hike November 2026 Prediction: कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतातील सरकारी इंधन कंपन्या तोटा सहन करून ग्राहकांना पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करत होता. पण हा तोटा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने केंद्र सरकारने मे महिन्यात टप्प्याटप्प्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले होता. आता दिवाळीच्या तोंडावार आणि सात राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार नोव्हेंबरमध्ये पुन्हा यामध्ये वाढ करण्याची शक्यता असल्याचे मत, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ अलेक्झांड्रा हर्मन प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

ब्लूमबर्गमधील एका वृत्तानुसार, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ अलेक्झांड्रा हर्मन प्रसाद यांनी सांगितले की, इंधनाचे दर वाढवण्यासाठी नोव्हेंबर हा शेवटचा व्यावहारिक काळ आहे. पुढील वर्षी ज्या सात राज्यांत निवडणुका होणार आहेत, त्यापैकी उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांत मार्च ते मे महिन्यादरम्यान मतदान होणार आहे.

प्रस्तावित दरवाढ ही मे महिन्यात लागू करण्यात आलेल्या एकूण ७.५% वाढीच्या निम्मी असू शकते. मध्यपूर्वेतील युद्धामुळे इंधनाच्या किरकोळ किमती वाढल्या होत्या, तो काळ वगळता इतर वेळी अशा प्रकारची वाढ दिसून आली नव्हती. या दरवाढीमुळे ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत किरकोळ महागाई दर ६.२% पर्यंत आणि २०२७ च्या पहिल्या तीन महिन्यांत ६.५% पर्यंत पोहोचू शकतो. हे दोन्ही आकडे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या २-६% या महागाई लक्ष्यापेक्षा अधिक आहेत, असे त्यात म्हटले आहे.

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचे अंदाज रिझर्व्ह बँकेच्या अंदाजांपेक्षा अधिक आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या चलनविषयक धोरण आढाव्यात, आरबीआयने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी महागाईचा दर ६% राहण्याचा आणि जानेवारी-मार्च तिमाहीत तो कमी होऊन ५.७% वर येईल, असा अंदाज वर्तवला होता.

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या मते, पुढील वर्षी किमतींवरील दबाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी महागाईचा दर ५.४% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर आरबीआयने हा दर ५.२% असेल असे म्हटले होते.

अलेक्झांड्रा हर्मन प्रसाद यांनी असेही म्हटले की, निवडणुकीतील गैरप्रकारांच्या आरोपांवरून भारतात सुरू असलेल्या आंदोलनाचा आर्थिक वाढीवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण हे आंदोलन प्रामुख्याने दिल्लीपुरतेच मर्यादित असून, च्याचा प्रभाव मोठा ठरेल इतकी त्याची व्याप्ती नाही.