Petrol Diesel Price : कच्च्या तेलाचे दर १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्याने जगभरात पेट्रोल-डिझेलरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीतही भारतात इंधनाचे दर आजही स्थिर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निवडणुका संपल्यानंतर इंधनात मोठी दरवाढ होणार असल्याची चर्चा आहे. आता तर एक कथित सरकारी आदेश व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पेट्रोल १० रुपये आणि डिझेल १२.५ रुपयांनी महागल्याचा दावा केला जात आहे. या बातमीमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
काय आहे इंधन दरवाढीचं सत्य
सोशल मीडियावरील या दाव्यांची दखल घेत पीआयबी फॅक्ट चेकने याचे स्पष्टीकरण दिले आहे. व्हायरल होत असलेला तो आदेश पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणारा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने इंधन दरात अशी कोणतीही वाढ केलेली नाही. नागरिकांनी केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील आजचे दर (३० एप्रिल २०२६)
| शहर | पेट्रोल (प्रति लिटर) | डिझेल (प्रति लिटर) |
| दिल्ली | ९४.७७ | ८७.६७ |
| मुंबई | १०३.५४ | ९०.०३ |
| कोलकाता | १०५.४५ | ९२.०२ |
| चेन्नई | १००.८४ | ९२.३९ |
महागाईची टांगती तलवार कायम
जरी आज दर वाढले नसले, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल १२० डॉलरच्या पुढे गेल्याने भविष्यात दरवाढीचे संकट नाकारता येत नाही. इराण-अमेरिका तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचा ताण भारतीय रुपयावर आणि तेल कंपन्यांच्या नफ्यावर पडू शकतो.
कंपन्या तोट्यात विकतायेत पेट्रोल-डिझेल
कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने याचा मोठा फटका भारतीय तेल कंपन्यांना बसत आहे. त्यांना डिझेलच्या विक्रीवर प्रति लिटर १०० रुपये आणि पेट्रोलवर प्रति लिटर २० रुपये इतका प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षी कच्च्या तेलाची सरासरी किंमत ७० डॉलर प्रति बॅरल होती, ती आता थेट १२० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. किमतींमधील या अफाट वाढीमुळे तेल कंपन्यांच्या नफ्यावर आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. सरकारने कंपन्यांवरील शुल्क कमी केले असले तरी तोटा भरून निघत नसल्याने भाववाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीच नायरा, शेल सारख्या खासगी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे.
