Petrol vs Hybrid vs EV : पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधनदराच्या किमती सातत्याने वाढतच चालल्या आहेत. परिणामी लोक आता वेगवेगळे वाहन पर्याय शोधत आहेत. नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असताना आजकाल प्रत्येक ग्राहकासमोर एकच मोठा प्रश्न असतो “पेट्रोल गाडी घेऊ, हायब्रिड की थेट इलेक्ट्रिक? काही वर्षांपूर्वी फक्त पेट्रोल आणि डिझेल असे दोनच पर्याय असायचे. पण आता बाजारात नवनवीन तंत्रज्ञान आल्यामुळे नेमकी कोणती गाडी दीर्घकाळात खिशाला परवडणारी ठरेल? याबाबत अनेकांना निर्णय घेता येत नाही.

Petrol vs Hybrid vs EV
(छायाचित्र – कॅन्वा)

पेट्रोल : कमी किंमत, पण इंधनाचा मोठा खर्च

पेट्रोल गाडी आजही अनेकांची पहिली पसंती आहेत. कारण, या वाहनांसाठी देशात एक परिसंस्था आहे. म्हणजे देशाच्या कोणत्याही भागात तुम्हाला पेट्रोल किंवा दुरुस्ती करणारे मिळून जातील. पेट्रोल गाड्यांची खरेदी किंमत हायब्रिड आणि ईव्हीच्या तुलनेत खूपच कमी असते. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे प्रति किलोमीटर प्रवासाचा खर्च सुमारे ६ ते ८ रुपये येतो (गाडीचे मायलेज १५-१८ गृहित धरल्यास). इंजिन, ऑईल चेंज आणि इतर मेकॅनिकल भागांमुळे यांचा नियमित मेंटेनन्स खर्च मध्यम स्वरूपाचा असतो. जर तुमचे रोजचे रनिंग खूप कमी असेल (उदा. महिना ५०० किमीपेक्षा कमी), तर पेट्रोल गाडी तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण गाडी खरेदी करताना वाचलेले पैसे इंधनाच्या खर्च भरून काढतात.

Petrol vs Hybrid vs EV
(छायाचित्र – FE)

हायब्रिड वाहन

हायब्रिड गाड्यांमध्ये पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर दोन्ही एकत्र काम करतात. यात प्रामुख्याने ‘स्ट्राँग हायब्रिड’ गाड्यांना जास्त पसंती दिली जाते. या गाड्या पेट्रोल मॉडेलपेक्षा साधारण २ ते ३ लाख रुपयांनी महाग असतात. हायब्रिड गाड्यांचे मायलेज थक्क करणारे असते. शहरात या गाड्या २२ ते २८ किमी प्रति लीटरपर्यंत मायलेज देतात. यामुळे प्रति किलोमीटर खर्च ४ ते ५ रुपयांवर येतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे ही बॅटरी गाडी चालत असताना स्वतःच चार्ज होते. त्यामुळे ईव्हीसारखे चार्जिंग स्टेशन शोधण्याचे टेन्शन नसते. ज्यांचे महिन्याचे रनिंग जास्त आहे, त्यांच्यासाठी हायब्रिड हा फायदेशीर पर्याय आहे.

Petrol vs Hybrid vs EV
(छायाचित्र – कॅन्वा)

इलेक्ट्रिक वाहन : सर्वात स्वस्त प्रवास

आताच्या काळात इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. ईव्हीची किंमत पेट्रोल गाड्यांपेक्षा ३ ते ५ लाख रुपयांनी जास्त असते. ईव्हीचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे तिचा रनिंग कॉस्ट. घरगुती विजेवर चार्ज केल्यास ईव्हीचा प्रति किलोमीटर खर्च अवघा १ ते १.५ रुपये येतो. म्हणजेच पेट्रोलच्या तुलनेत तब्बल ८०% बचत! ईव्हीमध्ये इंजिन, गिअरबॉक्स नसल्यामुळे ऑईल चेंज, सर्व्हिसिंगचा खर्च नगण्य असतो. म्हणजेच मेंटेनन्स अतिशय कमी. फक्त चार्जिंगसाठी लागणारा वेळ आणि बॅटरी संपण्याची भीती या अजूनही मोठ्या समस्या आहेत. तसेच ८-१० वर्षांनी बॅटरी बदलण्याचा मोठा खर्च येऊ शकतो.

दीर्घकाळात कोणती गाडी ठरेल फायदेशीर?

  • जर तुमचे रोजचे रनिंग ६० किलोमीटरपेक्षा जास्त असेल आणि तुमचा प्रवास मुख्यतः शहरात किंवा निश्चित रूटवर असेल, तर इलेक्ट्रिक गाडी दीर्घकाळात तुमचे लाखो रुपये वाचवेल. ३ ते ४ वर्षांतच गाडीची अतिरिक्त किंमत इंधनाच्या बचतीमधून वसूल होते.
  • तुमचा आठवड्याला प्रवास ५०० किमीपेक्षा जास्त असेल. ज्यात तुम्हाही शहराबाहेरही जावे लागते. जिथे प्रत्येकवेळी चार्जिंगची सुविधा असेलच असं नाही. अशा वेळी हायब्रिड गाडी सर्वोत्तम ठरते. ती ईव्हीसारखेच उत्तम मायलेज देते. पेट्रोलमुळे रेंजचे टेन्शन राहत नाही.
  • महिन्यात केवळ ४०० ते ५०० किमी प्रवास करणाऱ्यांसाठी आजही पेट्रोल गाडीच फायदेशीर आहे. कारण ईव्ही किंवा हायब्रिडसाठी सुरुवातीला मोजलेले अतिरिक्त ३ ते ४ लाख रुपये इंधनाच्या बचतीतून वसूल व्हायला १० वर्षांपेक्षा जास्त काळ लागेल.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जे वाहन घेणार आहात त्याचे सर्व्हिस सेंटर कुठे आहे? हेही महत्त्वाचे आहे. अन्यथा देखभाल दुरुस्तीसाठी तुम्हाला वेगळ्या शहरात जायला नको.