PhonePe CEO Sameer Nigam Capital Gains Tax Nikhil Kamath Podcast: देशातील आघाडीचा ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe चे सीईओ समीर निगम यांनी नोकरी किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्यावर इतका कमी कर का आकारला जातो, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, जगात आत पैशातून पैसा कमावण्याचा वेग नोकरी किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक आहे. यामुळे श्रीमंत आणि सामान्य लोक यांच्यातील आर्थिक असमानता वाढत आहे.
निखिल कामथ यांच्यासोबतच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना निगम म्हणाले, “नोकरी किंवा व्यवसायातून पैसा कमावण्यापेक्षा, पैशातून पैसा कमावण्याचा वेग कितीतरी पटीने जास्त आहे. हा एक जागतिक कल आहे आणि म्हणूनच उत्पन्नातील फरक इतका वाढला आहे.”
स्वतःच्या बळावर आयुष्यात प्रगती
समीर निगम यांनी पुढे नमूद केले की, त्यांचा जुन्या पद्धतीच्या अमेरिकन भांडवलशाहीवर जास्त विश्वास आहे. काही ही एक अशी व्यवस्था जिथे एखादी व्यक्ती श्रीमंत किंवा गरीब कुटुंबात जन्मली तरी, स्वतःच्या बळावर आयुष्यात प्रगती करू शकते. मात्र, जागतिक भांडवली बाजार सध्या अत्यंत विस्कळीत झाले आहेत, ज्यामुळे सरकारी हस्तक्षेपाची गरज अधिक वाढली आहे.
या पॉडकास्टमधील संभाषणादरम्यान निखिल कामथ यांनी ऑस्ट्रेलिया आणि काही नॉर्डिक देशांचा उल्लेख करत सांगितले की, करविषयक हस्तक्षेपांमुळे या देशांत असमानता कमी होण्यास मदत झाली आहे. असमानता मोजणाऱ्या गिनी गुणांकाचा संदर्भ दिल्यानंतर, त्यांची चर्चा मालमत्ता कर, वारसा कर आणि प्रगतीशील करप्रणालीकडे वळली.
वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीवर २० टक्के कर
या चर्चेत एका मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीवर कर लावण्याचा प्रस्तावाचाही समावेश होता. पैसे कमावणाऱ्या व्यक्तीला ते आपल्या इच्छेनुसार वापरण्याची परवानगी असावी, परंतु एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त रक्कम वारसा हक्काने मिळण्यापूर्वी त्यांच्या मुलांनी २०% कर भरावा अशी कल्पनाही त्यांनी मांडली.
“हे असे बदल आहेत ज्यांची आपण मागणी करू शकतो, कारण ते व्यावहारिक आहेत”, असे कामत म्हणाले.
नफ्यावर जास्त कर आकारावा
या चर्चेत समीर निगम यांनी पुढे भांडवली नफ्याला मिळणाऱ्या अनुकूल वागणुकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि जास्त करांमुळे खाजगी इक्विटी गुंतवणूक कमी होईल हा युक्तिवाद फेटाळून लावला.
“केवळ खाजगी इक्विटी आहे म्हणून भांडवली नफ्यावर कमी दराने कर आकारला जाऊ नये. खाजगी इक्विटीमधील लोक बाजारात गुंतवणूक करणार नाहीत, हा युक्तिवाद नेहमीच केला जातो. पैसा कुठे ना कुठे गुंतवला जाणारच आहे. गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्यावरचा कर हा आयकराच्या दराच्या एक चतुर्थांश इतका कमी असू शकत नाही”, असे समीर निगम शेवटी म्हणाले.
