PhysicsWallah Teacher Reward Policy : सध्या देशातील आयआयटी-जेईई आणि नीट परीक्षांच्या कोचिंग क्षेत्रात स्पर्धा तीव्र झाली आहे. कोचिंग सेंटरची प्रसिद्धी आणि प्रवेश वाढवण्यासाठी आता थेट ‘विद्यार्थी पळवापळवी’चे प्रकार घडत आहेत. धक्कादायक म्हणजे यासाठी थेट शिक्षकांनाच कोट्यवधींचे आमिष दाखवले जात असल्याचे समोर आले आहे. शेअर बाजारात सुचिबद्ध असलेली देशातील अग्रगण्य एडटेक कंपनी ‘फिजिक्सवाला’च्या एका वादग्रस्त अंतर्गत ‘रिवॉर्ड पॉलिसी’ने या वादाला तोंड फुटले आहे. अलख पांडे हे या कंपनीचे सह-संस्थापक आहेत.

प्रवेश वाढवण्यासाठी १५ लाखांपर्यंत रोख बक्षीस

प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थांमधील हुशार आणि टॉप रँक आणू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचून आणल्यास, फिजिक्सवाला संबंधित शिक्षकांना २ लाख ते तब्बल १५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देत असल्याचे उघड झाले आहे. ‘मनीकंट्रोल’ या वेबसाईटनुसार, कंपनीच्या अंतर्गत धोरण दस्तऐवजाच्या तपासणीतून हा खळबळजनक खुलासा केला आहे.

रँकनुसार शिक्षकांना मिळणार रोख कमिशन

फिजिक्सवाला कंपनीचा अर्ध्याहून अधिक महसूल हा ऑफलाइन कोचिंगमधून येत आहे. कंपनी याचा अजून विस्तार करण्याची तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर फिजिक्सवालाने २०२७ च्या ऑफलाईन क्लासरूम बॅचसाठी हे धोरण लागू केल्याची माहिती आहे. जर एखाद्या शिक्षकाने जुन्या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्याला फिजिक्सवालामध्ये प्रवेश घेण्यास प्रवृत्त केले आणि त्या विद्यार्थ्याने चांगली रँक मिळवली, तर शिक्षकांना त्याच्या रँकनुसार पैसे दिले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या रँकसाठी तब्बल १५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर ५०१ ते १००० दरम्यान रँक असेल तर २,००,००० रुपये रिवॉर्ड देण्यात येणार आहे.

‘टॅलेंट नर्चरी टीम’ऐवजी थेट शिक्षकांचा वापर

कोचिंग उद्योगात हुशार विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी ‘स्कॉलरशिप’चा वापर केला जातो. म्हणजे प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला शुल्कात सवलत दिली जाते. यासाठी प्रत्येक संस्थेकडे ‘टॅलेंट नर्चर टीम’ नावाचा स्वतंत्र विभाग असतो. या टीमला इन्सेंटीव्ह देणे ही सामान्य बाब आहे. मात्र, नवीन नोकरीवर घेतलेल्या शिक्षकांनाच असे हुशार विद्यार्थी शोधण्यासाठी पैशांचे आमिष दाखवणे, हा उद्योगात चुकीचा पायंडा असल्याची टीका तज्ज्ञांकडून होत आहे.

फिजिक्सवालाचे स्पष्टीकरण

या वादावर बाजू मांडताना फिजिक्सवालाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “कर्मचाऱ्यांसाठीचा हा रिवॉर्ड प्रोग्राम आमच्याकडे नवीन नाही. कंपनी वेळोवेळी आपल्या अंतर्गत धोरणांचे पुनरावलोकन करत असते. प्रवक्ता पुढे म्हणाले, “जर एखाद्या विद्यार्थ्याने कर्मचाऱ्याच्या शिफारशीद्वारे प्रवेश घेतला आणि संबंधित विषयात चांगली रँक मिळवली तर, शिफारस करणारे कर्मचारी या धोरणांतर्गत पुरस्कारांसाठी पात्र ठरतात. पण, हे बक्षीस केवळ प्रवेशाशी संबंधित नाही, तर हा दीर्घकालीन प्रक्रियेचा भाग आहे.”