PIB Fact Check : आर्टिफिशयल इंटेलिजन्समुळे आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरू आहे. ऑटोमेशनमुळे इतर क्षेत्रातील रोजगारही वेगाने कमी होत आहे. अशा परिस्थितीत अनेकजण रोजगाराच्या संधी मोबाईलवरुन शोधत असतात. मात्र, एआयच्या जमान्यात खऱ्याखोट्यातील फरक अत्यंत सूक्ष्म झाला आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कथितरित्या एका ‘गुंतवणूक प्लॅटफॉर्म’ची जाहिरात करताना दिसत आहेत. यात केवळ २२,००० रुपयांची गुंतवणूक करून नागरिक दरमहा ३.५ लाख रुपयांपर्यंत बंपर कमाई करू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’च्या फॅक्ट चेक युनिटने या दाव्याचे पितळ उघडे पाडले आहे.

‘पीआयबी’ने काय म्हटलंय?

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयी पोस्ट केली आहे. यात फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत असलेला हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. भारत सरकार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा कोणत्याही गुंतवणूक प्लॅटफॉर्म किंवा योजनेची घोषणा केली नसल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांनी अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन पीआयबीने केलं आहे.

‘डीपफेक’ व्हिडीओमुळे अनेकांची फसवणूक

‘डीपफेक’ तंत्रज्ञानामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा फोटो, व्हिडिओ किंवा आवाजाची हुबेहूब नक्कल केली जाते. असे व्हिडीओ खरे की खोटे हे ओळखणे कठीण असते. या व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या जुन्या व्हिडिओ फुटेजचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर एआय टूलच्या मदतीने त्यांचा आवाज आणि ओठांची हालचाल बदलून, ते एका कथित खासगी योजनेचा प्रचार करत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. अशा फसव्या व्हिडिओंचा मुख्य उद्देश प्रभावी व्यक्तींच्या नावाचा गैरवापर करून लोकांची आर्थिक फसवणूक करणे असतो.

काय काळजी घ्यावी?

जर तुमच्या मोबाईलवर सोशल मीडिया अथवा टेक्स स्वरुपात अशी माहिती किंवा व्हिडीओ आल्यास त्याच्यावर विश्वास ठेवू नये. सर्वप्रथम सरकार किंवा खासगी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन याची खात्री करुण घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला केंद्र सरकार, सरकारी योजना किंवा व्हीआयपी व्यक्तींशी संबंधित कोणत्याही बातमीवर, व्हिडिओवर किंवा सोशल मीडिया पोस्टवर संशय असेल, तर तुम्ही थेट ‘पीआयबी फॅक्ट चेक’ची मदत घेऊ शकता. तुम्ही संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, व्हिडिओ किंवा यूआरएल 8799711259 या क्रमांकावर पाठवू शकता. किंवा तुम्ही तुमची तक्रार factcheck@pib.gov.in या अधिकृत ईमेलवर मेल देखील करू शकता.