PNB Q2 Results : सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेने (PNB) सप्टेंबर २०२६ मध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत ५,५३२ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत बँकेचा नफा ४,९०४ कोटी रुपये होता. त्यामुळे वार्षिक आधारावर बँकेच्या नफ्यात १२.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात झालेली वाढ आणि अनुत्पादित कर्जांसाठी (NPA) बाजूला ठेवाव्या लागणाऱ्या तरतुदींमध्ये झालेली मोठी घट ही बँकेच्या नफ्यातील वाढीची प्रमुख कारणे ठरली. मात्र, या कालावधीत नव्या अनुत्पादित कर्जांच्या प्रमाणातही वाढ नोंदवण्यात आली.
व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ
PNB च्या मुख्य उत्पन्नाशी संबंधित आकडेवारीतही सुधारणा दिसून आली. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) म्हणजेच व्याजातून मिळणारे उत्पन्न आणि व्याजापोटी केलेला खर्च यांतील फरक वार्षिक आधारावर १०.८ टक्क्यांनी वाढून ११,६०१ कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर तिमाहीत हा आकडा १०,४६९ कोटी रुपये होता.
दरम्यान, बँकेच्या निव्वळ व्याज मार्जिनमध्ये (NIM) देखील वाढ झाली आहे. बँकेला व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत किती मार्जिन मिळत आहे, हे NIM दर्शवते. जून तिमाहीत २.५० टक्के असलेले NIM सप्टेंबर तिमाहीत वाढून २.५८ टक्क्यांवर पोहोचले. म्हणजेच, मागील तिमाहीच्या तुलनेत त्यात ०.०८ टक्के अंकांची किंवा ८ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली. या कालावधीत बँकेच्या कार्यकारी नफ्यातही वाढ झाली. सप्टेंबर तिमाहीत बँकेचा कार्यकारी नफा वार्षिक आधारावर ४.२ टक्क्यांनी वाढून ७,५३२ कोटी रुपयांवर पोहोचला. वर्षभरापूर्वी याच कालावधीत बँकेचा कार्यकारी नफा ७,२२७ कोटी रुपये होता.
अनुत्पादित कर्जांच्या प्रमाणात सुधारणा, तरतुदींमध्ये घट
बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेशी म्हणजेच कर्जाच्या गुणवत्तेशी संबंधित आकडेवारीतही सुधारणा झाली. जून तिमाहीअखेर २.७८ टक्के असलेले एकूण अनुत्पादित कर्जांचे (GNPA) प्रमाण सप्टेंबरअखेर घटून २.५५ टक्क्यांवर आले. तसेच, निव्वळ अनुत्पादित कर्जांचे (NNPA) प्रमाणही ०.२८ टक्क्यांवरून घटून ०.२५ टक्क्यांवर आले.
अनुत्पादित कर्जांमुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य नुकसानासाठी बँकेला जी रक्कम बाजूला ठेवावी लागते, तिला तरतूद (प्रोव्हिजनिंग) असे म्हणतात. सप्टेंबर तिमाहीत PNB ची तरतूद वार्षिक आधारावर ८४.९ टक्क्यांनी घटून ९७ कोटी रुपयांवर आली. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत ही रक्कम ६४३ कोटी रुपये होती. जून तिमाहीतील ५४१ कोटी रुपयांच्या तुलनेतही त्यात ८२.१ टक्क्यांची घट झाली.
नवीन अनुत्पादित कर्जांच्या (फ्रेश स्लिपेज) प्रमाणात वाढ
अनुत्पादित कर्जांच्या प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी तिमाहीदरम्यान नव्याने अनुत्पादित कर्जांमध्ये (फ्रेश स्लिपेज) वाढ झाली. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अशा कर्जांची रक्कम २,२३३ कोटी रुपये होती. जून तिमाहीत ही रक्कम १,९९६ कोटी रुपये होती. म्हणजेच, मागील तिमाहीच्या तुलनेत त्यात ११.९ टक्क्यांची वाढ झाली.
मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत फ्रेश स्लिपेज १,८१२ कोटी रुपये होते. त्या तुलनेत, वार्षिक आधारावरही त्यात २३.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
