मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ५,२२५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत १४.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेने ४,५६७ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नफा वाढण्यामागील प्रमुख कारण म्हणजे व्याजातून होणाऱ्या उत्पन्नात झालेली वाढ आहे.

सरलेल्या मार्च तिमाहीत बँकेचा नफा वाढला असला, तरी एकूण उत्पन्नात किरकोळ घट दिसून आली आहे. बँकेचे एकूण उत्पन्न किंचित घटले असून ते ३६,३१९ कोटी रुपयांवर आले, जे एक वर्षापूर्वी ३६,७०५ कोटी रुपये होते. फक्त व्याजातून होणाऱ्या उत्पन्नाचा विचार करता त्यात वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत बँकेची व्याजातून मिळणारी कमाई ३२,१५७ कोटी रुपयांवर पोहोचली, जी मागील वर्षी याच कालावधीत ३१,९८९ कोटी रुपये होती.

बुडीत कर्जाच्या आघाडीवर बँकेच्या कामगिरीत सुधारणा झाली असून एकूण बुडीत कर्ज (ग्रॉस एनपीए) प्रमाण घटून २.९५ टक्क्यांवर आले आहे, जे गेल्यावर्षी याच तिमाहीत ३.९५ टक्के होते. तसेच, निव्वळ बुडीत कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) कमी होऊन ०.२९ टक्क्यांवर आले आहे, जे पूर्वी ०.४ टक्के होते.

शेअरधारकांना मिळणार लाभांश

पीएनबीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्रतिसमभाग ३ रुपयांचा लाभांश देण्याची शिफारस केली आहे. मात्र, याला अंतिम मंजुरी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) शेअरधारकांकडून मिळेल. मंगळवारच्या सत्रात पीएनबीचा समभाग ०.७३ टक्क्यांनी घसरून १०७.८९ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे १,२३,९९७ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.