PNG Connections : पश्चिय आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या एलपीजीची टंचाई रोखण्यासाठी सरकारने पीएनजीचा आधार घेतला आहे. मार्च २०२६ पासून आतापर्यंत ५ लाखांहून अधिक घरांमध्ये पीएनजी गॅस पोहोचला असून, सुमारे ५.६८ लाख नागरिकांनी नवीन कनेक्शनसाठी अर्ज केले आहेत. ही आकडेवारी ऐतिहासिक असून देशाच्या उर्जा सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. तुम्ही देखील घरबसल्या पीएनजी कनेक्शनसाठी अर्ज करू शकता.

एलपीजी टंचाई आणि पीएनजीचा वाढता टक्का

पश्चिम आशियातील तणावामुळे एलपीजीच्या पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झाला आहे. अशा वेळी पीएनजी हा अधिक स्थिर आणि सुरक्षित पर्याय म्हणून समोर येत आहे. ज्या भागात पाइपलाइन उपलब्ध आहे, तिथे ग्राहकांना एलपीजी सोडून पीएनजी स्वीकारण्याचा सल्ला दिला जात आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांच्या माहितीनुसार, १९ एप्रिलपर्यंत सुमारे ३९,४०० ग्राहकांनी आपले एलपीजी कनेक्शन अधिकृतपणे सरेंडर केले आहे.

गॅस पुरवठ्याची सद्यस्थिती

व्यावसायिक एलपीजीची उपलब्धता सध्या संकटपूर्व पातळीच्या ७० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. एप्रिलच्या पहिल्या २० दिवसांत सुमारे १,२३,६८० टन कमर्शियल गॅसची विक्री झाली. मात्र, दीर्घकालीन विचार करता सरकार आता सिटी गॅस नेटवर्कला प्राधान्य देत आहे. घरगुती पीएनजी आणि वाहतुकीसाठी लागणाऱ्या सीएनजी सेगमेंटला पूर्ण पुरवठा केला जात आहे.

व्यवसायिक वापरासाठीही पीएनजी मिळणार

इंद्रप्रस्थ गॅस लि., महानगर गॅस लि., गेल गॅस आणि भारत पेट्रोलियम यांसारख्या कंपन्यांना व्यावसायिक वापरासाठीही पीएनजी कनेक्शन देण्याला प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे हॉटेल आणि उद्योगांना सिलिंडरच्या रांगेत उभे राहण्यापासून सुटका मिळणार आहे.

पीएनजी कनेक्शन घेण्याची प्रक्रिया

  • तुमच्या भागात कोणती कंपनी सेवा देते हे तपासा (उदा. मुंबईत महानगर गॅस).
  • ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि मालमत्तेची कागदपत्रे जोडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.
  • ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंत अनामत रक्कम भरावी लागते, जी रिफंडेबल असते.
  • कागदपत्रांची पडताळणी आणि जागेची पाहणी झाल्यानंतर ७ ते १५ दिवसांच्या आत गॅस मीटर आणि पाइपलाइन बसवून कनेक्शन चालू केले जाते.