पुणे : आघाडीची सराफी पेढी असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने ‘स्वर्ण स्वराज’ या राष्ट्रहिताच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. देशातील घराघरांत साठवून ठेवलेले निष्क्रिय सोने पुन्हा अर्थचक्रात आणणे, सोन्याच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करणे आणि अधिक जबाबदार पद्धतीने सोन्याचा वापर व खरेदी करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा उपक्रम म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना सोन्याच्या खरेदीत संयम बाळगण्याचे केलेले आवाहन स्वीकारत, राष्ट्रहिताच्या भावनेतून पीएनजी ज्वेलर्सने दिलेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद केवळ एका व्यवसायाचा नसून, तब्बल १९४ वर्षांपासून भारतीय कुटुंबांशी संस्थेने जोडलेल्या नात्याचा आहे. पीएनजी ज्वेलर्सने महामंदी, दोन महायुद्धे, स्वातंत्र्यलढा, फाळणी आणि जागतिक महामारी यांसारख्या अनेक ऐतिहासिक टप्प्यांमध्ये देशासोबत वाटचाल केली आहे. ग्राहकांशी असलेली पीएनजी ज्वेलर्सची नाळ ही केवळ व्यवहारांवर आधारित नसून अनेक पिढ्यांपासून जपलेल्या विश्वासाची आहे. ‘स्वर्ण स्वराज’ हाच त्या विश्वासाचा विस्तार आहे.
भारतीय घरांमध्ये साठवलेले अंदाजे २५,००० टनांहून अधिक सोने देशाची एक मोठी संपत्ती आहे. मात्र त्यातील मोठा हिस्सा बँक लॉकर, तिजोरी आणि वारशातील दागिन्यांमध्ये बंदिस्त राहिला आहे. सोन्याची चमक कमी झालेली नाही; पण देशाच्या अर्थव्यवस्थेकडे जाणारा त्याचा प्रवाह थांबला आहे. याच सोन्याला पुन्हा अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी ‘स्वर्ण स्वराज’ उपक्रम पीएनजी ज्वेलर्स राबवत आहे.
जेव्हा पंतप्रधान देशवासियांना आवाहन करतात, तेव्हा त्याकडे केवळ नाममुद्रेच्या नजरेतून पाहत नाही, तर देशाप्रती असलेली जबाबदारी म्हणून प्रतिसाद देतो. गेली १९४ वर्षे पीएनजी ज्वेलर्स भारतीय कुटुंबांच्या आनंद, परंपरा आणि आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचा विश्वासू भाग राहिले आहे. आज त्या विश्वासाला एका मोठ्या राष्ट्रीय उद्दिष्टाशी जोडत आहोत. भारतातील सोने भारतातच प्रवाही राहणे, ही केवळ आर्थिक गरज नाही तर देशासाठी आपण एकत्रितपणे उचलू शकणारे प्रभावी पाऊल आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले.
स्वर्ण स्वराजच्या सहा प्रमुख उद्दिष्टे काय?
१. जुने सोने एक्सचेंज
पीएनजी ज्वेलर्स सर्व दालनांमध्ये आणि फ्रँचायझी स्टोअरमध्ये विशेष सुवर्ण पुनर्प्रवाह केंद्र (गोल्ड रिसर्क्युलेशन काउंटर) सुरू करणार आहे. ग्राहकांना त्यांच्या घरातील जुने, न वापरलेले, तुटलेले किंवा वारशातून मिळालेले दागिने पुन्हा अर्थचक्रात आणण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. प्रत्येक दागिन्याचे मूल्यांकन पूर्ण पारदर्शकतेसह तात्काळ केले जाईल. या उपक्रमांतर्गत जमा झालेले सोने शुद्ध करून पुन्हा देशातील दागिने उद्योगात वापरले जाईल, ज्यामुळे नव्याने सोने आयात करण्यावरील निर्भरता कमी होण्यास मदत होईल. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ‘स्वर्ण स्वराज सर्टिफिकेट’ देऊन त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात येईल.
२. ब्रायडल आणि सणासुदीच्या खरेदीत कमी कॅरेटच्या सोन्याला प्रोत्साहन
२२ कॅरेट सोन्याशी भारतीयांचे सांस्कृतिक आणि भावनिक नाते आहे आणि पीएनजी ज्वेलर्स त्याचा आदर करते. मात्र, देशाच्या आर्थिक गरजांचा विचार करता १८ कॅरेट सोन्याचा वापर वाढवण्याची वेळ आली आहे. १८ कॅरेटमध्ये कमी शुद्धता असलेले सोने वापरले जाते, तरीही डिझाईन आणि सौंदर्य तितकेच उत्कृष्ट राहते. पीएनजी ज्वेलर्स १८ कॅरेट दागिन्यांच्या कलेक्शनचा विस्तार करत, ग्राहकांमध्ये अधिक जागरूक आणि सकारात्मक संवाद निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.
३. ‘लाइटस्टाइल बाय पीएनजी’ अंतर्गत १८ कॅरेट आणि ९ कॅरेट कमी वजनाचे दागिने
दररोज वापरता येतील असे हलके आणि आधुनिक डिझाईन्स असलेले १४ कॅरेट आणि ९ कॅरेटचे दागिने कमी सोन्यात तयार होतात. तरुण ग्राहकांमध्ये अशा दागिन्यांची मागणी वाढताना दिसत आहे. ‘लाइटस्टाइल बाय पीएनजी’ या नाममुद्रेअंतर्गत अशा कलेक्शन्सचा विस्तार करून त्यांना आधुनिक भारतीय परंपरेचा एक भाग म्हणून आम्ही ग्राहकांपुढे सादर करत आहोत.
४. समुदायांमध्ये संवाद आणि जनजागृती
पीएनजी ज्वेलर्सची खरी ताकद म्हणजे अनेक पिढ्यांपासून जपलेला ग्राहकांचा विश्वास. ‘स्वर्ण स्वराज’ अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्था, गणेश मंडळे, महिला मंडळे आणि स्वयं-सहाय्यता गटांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरात संवाद सत्रे आयोजित केली जाणार आहेत. या उपक्रमाचे उद्दिष्ट केवळ जनजागृती नसून, लोकांमध्ये सोन्याबद्दल अधिक माहितीपूर्ण आणि जबाबदार विचारसरणी निर्माण करणे आहे.
५. सोन्याच्या सजग आणि जबाबदार वापरासाठीची सांस्कृतिक चळवळ
‘स्वर्ण स्वराज’ ही अल्पकालीन मोहीम नसून, सोन्याचा वापर, मालकी आणि त्याचे महत्त्व याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल घडवून आणण्याचा पीएनजी ज्वेलर्सचा दीर्घकालीन प्रयत्न आहे. ग्राहकांनी सोन्याचा वापर आणि खरेदी अधिक समजून-उमजून आणि जबाबदारीने करावी, यासाठी पीएनजी ज्वेलर्स विविध माध्यमांतून सातत्याने जनजागृती आणि संवाद साधणार आहे.
६. उद्योग आणि धोरणात्मक स्तरावर सक्रिय सहभाग
भारताच्या सोन्याच्या अर्थव्यवस्थेत अपेक्षित बदल घडवण्यासाठी केवळ ब्रँड स्तरावरील उपक्रम पुरेसे नसतात. त्यामुळे देशांतर्गत सोन्याच्या पुनर्प्रवाह आणि पुनर्वापराला चालना देणाऱ्या धोरणात्मक सुधारणांसाठी उद्योग संघटना आणि धोरणकर्त्यांशी सक्रिय व सकारात्मक संवाद साधण्याची भूमिका कंपनी घेणार आहे.
