मुंबई : पी. एन. गाडगीळ अँड सन्स (पीएनजीएस) समूहाचे पाठबळ असलेली आणखी एक प्रामुख्याने हिऱ्यांच्या दागिन्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करणारी कंपनी गुंतवणूकदारांना आजमावणार आहे. ‘पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लिमिटेड’ने आयपीओद्वारे ३८० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.

पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीने आयपीओसाठी प्रत्येकी ३६७ रुपये ते ३८६ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. येत्या २४ ते २६ फेब्रुवारी या दरम्यान गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी बोली लावता येणार आहे. या पूर्णपणे नव्याने ९८ लाख समभाग विक्रीला (फ्रेश इश्यू) खुल्या होत असलेल्या या आयपीओतून एकंदर ३८० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित असून, त्याचा वापर नवीन दालनांची स्थापना आणि विपणासाठी करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, असे पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

गुंतवणूकदारांना पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी आयपीओसाठी बोली लावताना, किमान ३२ समभागांसाठी आणि त्यानंतर ३२ समभागांच्या पटीत अर्ज करावा लागेल. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी या आयपीओतील १० टक्के हिस्सा राखीव आहे. आयपीओपश्चात पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा समभाग बुधवार, ४ मार्च रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

आयपीओच्या प्रस्ताव पुस्तिकेत (आरएचपी) म्हटल्याप्रमाणे, कंपनीने नवीन आयपीओतून उभारल्या जाणाऱ्या निधीतून १५ नवीन विक्री दालनांच्या स्थापनेसाठी २८६.५६ कोटी रुपये वापरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर ३५.४ कोटी रुपये विपणन आणि प्रचार-प्रसार मोहिमांसाठी वापरले जातील. वर्ष २००४ मध्ये स्थापन झालेली पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी ही हिऱ्यांच्या दागिन्यांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. ‘रेवा’ या ब्रँड नावाचा वापर करून, कंपनी मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान रत्नांसह हिऱ्यांमध्ये जडलेले सोने आणि प्लॅटिनमचे विविध दागिने तयार करते.

कंपनीच्या उत्पादनांमध्ये अंगठ्या, कानातले, हार, पेंडंट, सॉलिटेअर, बांगड्या, ब्रेसलेट, मंगळसूत्र, नाकातील कुड्या आणि साखळ्यांचा समावेश आहे. कंपनीचा व्यवसाय महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमधील २५ शहरांमध्ये पसरलेल्या ३४ विक्री दालनांद्वारे सध्या सुरू आहे. ही नवागत कंपनी सध्या बाजारात सूचीबद्ध मुंबईस्थित त्रिभोवनदास भीमजी झवेरी लिमिटेड (पी/ई १५.७४ पट), दक्षिणेकडील थंगमायिल ज्वेलरी लिमिटेड (पी/ई ८०.९६ पट) आणि कोलकाताच्या सेन्को गोल्ड लिमिटेड (पी/ई ३३ पट) यांच्याशी स्पर्धा करेल. ग्रे मार्केटमध्ये पीएनजीएस रेवा डायमंडच्या शेअर्ससाठी सोमवारपर्यंत ९ ते १० टक्के प्रीमियम मिळत असून, तिचे आकर्षक मूल्यांकन पाहता चढाओढीने बोली लागणे अपेक्षित आहे.