मुंबईः देशातील भांडवली गुंतवणुकीचा विस्तार चालू आर्थिक वर्षात सरकारी पायाभूत सुविधा क्षेत्राच्यापलिकडे अन्यत्र सुरू झाला असून, कमी व्याज दर, कर कपात, आयात शुल्कातील कपात यामुळे ग्राहकोपयोगी वस्तू, लॉजिस्टिक्स व मालवाहतूक, किरकोळ विक्री आणि भांडवली वस्तू अशा उद्योगांमध्ये खासगी क्षेत्रातून भांडवली गुंतवणुकीला चालना मिळताना दिसत आहे, असा आश्वासक अंदाज बँक ऑफ बडोदाच्या आर्थिक संशोधन अहवालात सोमवारी वर्तविण्यातआला.
गेल्या काही वर्षांत, सरकारकडून भांडवली खर्च सढळ हस्ते केला जाऊन, अर्थव्यवस्थेला सावरण्याचे काम केले जात आहे. खासगी क्षेत्रातून भांडवली विस्तार अपेक्षेप्रमाणे नसल्याची धोरणकर्त्यांची तक्रार होती. तथापि त्याला खऱ्या अर्थाने चालना मिळत असून, प्रत्यक्ष गुंतवणूक नियोजनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शिवाय ही गुंतवणूक केवळ कागदावर नसून प्रत्यक्ष जमिनीवर उतरत आहे. अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने असा स्वागतार्ह निष्कर्ष या अहवालाने नमूद केला आहे.
रिझर्व्हबँकेनेफेब्रुवारी२०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत व्याजदरात सव्वा टक्के कपात केली. त्याच्याच जोडीला सरकारची भांडवली खर्चातील वाढ आणि ग्राहकांच्या मागणीला चालना देणाऱ्या कर सवलती यांच्या एकदंर परिणामामुळे चालू आर्थिक वर्षात भांडवलाचा ओघ विस्तारणार आहे. आयात शुल्काबाबतची अनिश्चितता कमी झाल्याने वस्त्रोद्योग, कृषी आणि मौल्यवान रत्ने या निर्यातीभिमुख क्षेत्रातील आत्मविश्वास वाढला आहे. याचबरोबर वाहन निर्मिती आणि ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन अर्थात एफएमसीजी क्षेत्रातही मागणी वाढून भांडवलात वाढ होईल.
बँकेच्या या अहवालात २ हजार ३८३सूचिबद्ध कंपन्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.त्यांची एकूण स्थिर मालमत्ता आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ५.८ टक्क्यांनी वाढून ४६.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. सरत्या आर्थिक वर्षातअमेरिकेच्या आयात शुल्काशी निगडित अनिश्चितता असल्याने ही वाढ मध्यम स्वरूपाची राहिली. सरत्या आर्थिक वर्षात नऊ क्षेत्रांनी एकूण स्थिर मालमत्तेत १० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली आहे. त्यात भांडवली बाजार क्षेत्राची वाढ सर्वाधिक असून, ती ३३.३ टक्के आहे. त्याखालोखाल इलेक्ट्रिकल्स ३०.१ टक्के, पायाभूत सुविधा १९.७ टक्के आणि भांडवलीवस्तू १७.५ टक्के अशी वाढ झालीआहे.
ई-कॉमर्सचा विस्तार आणि क्रयशक्तीमधील वाढ यामुळे मालवाहतूक, ग्राहकोपयोगी वस्तू आणि किरकोळ विक्री या क्षेत्रात दोन आकडी वाढ होऊ शकते. पायाभूत सुविधा आणिभांडवली वस्तू या क्षेत्रांची वाढ मात्र सार्वजनिक गुंतवणुकीवर अवलंबून असेल. यातून चालू आर्थिक वर्षात एकूण गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.८ टक्के वाढू शकेल, असेअहवालात नमूद करण्यात आले आहे.
कंपन्यांच्या मालमत्ता विस्ताराला बँकांनीही चांगली आर्थिक मदत केली. भांडवली वस्तू क्षेत्रात बँक पतपुरवठ्यात ३२.२ टक्के, हिरे व दागिन्यांमध्ये ४१.४ टक्के, आरोग्य निगा क्षेत्रामध्ये १७.७ टक्के तर ट्रेडिंग क्षेत्रात १६.२ टक्क्यांची पतपुरवठ्यात वाढ झाली.
