Pune founder digital india reality check: पुण्यातील एका कंपनीचे संस्थापक आणि नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक असलेल्या संदीप कुलकर्णी यांनी एक्सवर एका पोस्टच्या माध्यमातून सरकारी कार्यालयात नागरिकांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपला अनुभव मांडला आहे. यात त्यांनी मुलीसाठी पॅन कार्ड काढण्यासाठी त्यांना झालेला त्रास, धावपळ आणि सराकारी कार्यालयात मिळालेल्या वागणुकीवर भाष्य केले आहे. याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियासारख्या उपक्रमाच्या उपयुक्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सरकारी कार्यालयाची परिस्थिती
संदीप कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला सरकारी कार्यालयाच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, “माझी मुलगी १८ वर्षांची झाली आहे. आम्हाला तिच्यासाठी पॅन कार्ड काढायचे होते. ऐकायला सोपे वाटते ना? पण भारतात हे सोपे नाही. तिच्या आधार कार्डवर जन्मतारीख चुकीची होती. ती दुरुस्त करण्यासाठी आम्हाला २०१९ नंतर सुरू झालेल्या नवीन फॉरमॅटमधील जन्म दाखला आणायला सांगण्यात आले. जन्म दाखला कार्यालयात तर अर्जही उपलब्ध नव्हते. तिथे भिंतीवर अर्जाचा एक फोटो चिकटवलेला होता. आम्हाला तो फोटो काढून त्याची प्रिंट काढायला आणि मग तो भरून द्यायला सांगितले गेले. प्रिंट काढण्यासाठी आजूबाजूला कुठेही स्टेशनरीचे दुकान नव्हते. ते शोधण्यातच २० मिनिटे वाया गेली.”
अधिकाऱ्यांकडून कोणतेही सहकार्य नाही
संदीप कुलकर्णी यांनी या पोस्टमध्ये पुढे अधिकाऱ्यांकडून न मिळणाऱ्या सहकार्यावर लिहिले. ते म्हणाले, “यानंतर आणखी एक अडचण आली. तिच्या जुन्या जन्म दाखल्यावर एक शिक्का अशा प्रकारे उमटला होता की त्यावरचा नोंदणी क्रमांक वाचता येत नव्हता. तिथले अधिकारी मदत करायला तयार नव्हते. त्यांनी आम्हाला काही दिवसांनी परत यायला सांगितले. खूप आग्रह धरल्यानंतर एका तरुण कर्मचाऱ्याने तो क्रमांक शोधून काढला.”
जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी इतका त्रास!
“अर्ज सादर केला. आता सुटका झाली का? अजिबात नाही. ‘यासाठी २-३ महिने लागतील, सर’, असे त्या कर्मचाऱ्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार नवीन जन्म दाखला मिळण्यापूर्वी हा अर्ज अनेक सरकारी विभागांत पुढिल कार्यवाहीसाठी जातो. केवळ जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी इतका त्रास! आणि हे सर्व कशासाठी? तर १८ वर्षांच्या मुलीला तिचे पॅन कार्ड मिळावे म्हणून. आपण डिजिटल इंडियाबद्दल बोलतो, पण आजही मूलभूत सरकारी सेवा मिळवण्यासाठी नागरिकांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. एवढी साधी गोष्ट इतकी गुंतागुंतीची का असावी?” असा प्रश्न संदीप कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी उपस्थित केला.
