Pune Metro Property Tax Impact Metro Cess: पुणेकर गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या शिवाजीनगर ते मान-हिंजवडी दरम्यानच्या २३ किमी लांबीच्या पुणे मेट्रो मार्ग ३ चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होईल. दरम्यान वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे दोन मार्ग आधिपासूनच पुणेकरांच्या सेवेत आहे.

५० लाखांचे घर घेतल्यास मेट्रो टॅक्स किती?

पुण्यातील या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी संयुक्त निधीचा पुरवठा केला आहे. पण या निधी उभारणीमध्ये सामान्य पुणेकरांचेही मोठे योगदान आहे. कारण पुण्यात नवे, घर, जमीन किंवा दुकान खरेदी करताना खरेदीदारांना १ टक्के मेट्रो अधिभार भरावा लागतो. उदाहरणार्थ पुण्यात जर कोणी ५० लाखांचे घर खरेदी करत असेल तर त्याला मेट्रो अधिभार म्हणून ५० हजार रुपये भरावे लागतात. या १ टक्के अधिभाराची रक्कम मालमत्तेचे ‘करार मूल्य’ किंवा ‘रेडी रेकनर मूल्य’ यांपैकी जी रक्कम अधिक असेल त्यावर आकारली जाते.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये घर खरेदीसाठी किती टॅक्स लागतो?

पुणे महानगरपालिका किंवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत घर खरेदी करताना, एकूण मुद्रांक शुल्काचा दर पुरुष खरेदीदारांसाठी ७ टक्के, महिला खरेदीदारांसाठी ६ टक्के आणि संयुक्त मालकीच्या बाबतीत ६.५ टक्के इतका आहे.

मुद्रांक शुल्क

पुरुष गृहखरेदीदार (एकूण: ७ टक्के):

मूळ मुद्रांक शुल्क: ५ टक्के

मेट्रो उपकर (अधिभार): १ टक्के

स्थानिक संस्था कर (LBT): १ टक्के

महिला घरखरेदीदार (एकूण: ६ टक्के ):

मूळ मुद्रांक शुल्क: ४ टक्के

मेट्रो उपकर (अधिभार): १ टक्के

स्थानिक संस्था कर (LBT): १ टक्के

मेट्रो अधिभार म्हणजे काय?

मेट्रो, उड्डाणपूल आणि पूल यांसारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने, फेब्रुवारी २०१९ मध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे येथे ‘मेट्रो उपकर’ लागू करण्यात आला होता. पुढे कोरोनामुळे हा कर मार्च २०२२ पर्यंत स्थिगित करण्यात आला होता. तर, १ एप्रिल २०२२ पासून हा पुन्हा लागू झाला.

शिवाजीनगर-हिंजवडी मार्गाची वैशिष्ट्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केलेल्या पुणे मेट्रो मार्ग ३ ला ‘पिंक लाईन’ असेही म्हटले जाते. या मार्गाच्या उभारणीसाठी एकूण ८३०० कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. सुमारे २३ किलोमीटर लांबीची ही ‘पिंक लाईन’ मान ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकापर्यंत जोडलेली आहे. मेट्रोच्या या मार्गामुळे हिंजवडी आयटी हब आणि शिवाजीनगर यादरम्यान प्रवाशांसाठी प्रवास सुलभ होणार आहे. तसेच यामुळे खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास, वाहतूक कोंडी आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास, तसेच प्रमुख व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.