पुणे : पुण्याचे हवामान तुलनेने सौम्य असले तरी वाढत्या उष्णतेमुळे घरगुती वातानुकूलन (एसी) उपकरणांना मागणी वाढत आहे. घर वेगाने थंड करण्यासोबतच विजेचा अनावश्यक खर्च टाळण्याकडे ग्राहकांची कल आहे. यामुळे उच्च कार्यक्षमता, जलद शीतकरण आणि कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञाना यांचा मेळ साधण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती ऑप्टिमिस्ट कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष गोयल यांनी दिली. स्मार्ट एसीमुळे विजेच्या देयकात २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
वातानुकूलन यंत्र निर्मिती करणाऱ्या ऑप्टिमिस्ट कंपनीने पुण्यात विस्ताराचे पाऊल उचलले आहे. कंपनीने जूनमध्ये बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबादमध्ये विस्तार करीत आपली पहिली एअर कंडिशनर (एसी) म्हणजेच वातानूकूलन उपकरणांची श्रेणी सादर केली होती. त्यानंतर कंपनी कोलकता, चेन्नई, मुंबई आणि अहमदाबादसह प्रमुख बाजारपेठांमध्ये विस्तार करीत आहे. कंपनीने उच्च-कार्यक्षमता स्मार्ट एसी श्रेणी सादर केली आहे. बदलत्या ऋतूंमध्ये कार्यक्षम आणि कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाधारित शीतकरणाचा निर्णय घेणारी ही श्रेणी आहे, असे गोयल यांनी सांगितले.
उच्च-कार्यक्षमता मायक्रोचॅनेल उष्णता-विनिमयक, अनुकूलित उष्णता संरचना आणि ट्विन-रोटरी इन्व्हर्टर कॉम्प्रेसर ही या एसीची प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत. टर्बो प्लस तंत्रज्ञानामुळे १.४ टन क्षमतेच्या एसीला १.९ टनांपर्यंतची क्षमता मिळते. ऑप्टिमिस्टच्या एअर कंडिशनरला ६.०५ आयएसईईआर मानांकन आहे. भारतातील आव्हानात्मक परिस्थितीत उच्च ऊर्जा कार्यक्षमता देण्याच्या उद्देशाने ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत. सातत्यपूर्ण शीतकरणाची कामगिरी करीत वीज देयकात २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत घट साधण्यास ही एसी श्रेणी मदत करते. १.४ टन क्षमतेची ही श्रेणी ५० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात स्थिर शीतकरण देते, असे गोयल यांनी नमूद केले
