PNB Bank Fraud : विचार करा तुमच्या आयुष्यभराची जमापुंजी तुम्ही एखाद्या सरकारी बँकेत ठेवली आहे. एक दिवस अचानक तुम्हाला कळतं की तुमच्या खात्यात एकही रुपया नाही, अशावेळी तुमची काय अवस्था होईल? पंजाब नॅशनल बँकेच्या उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील ऐच्छर शाखेत खातं असलेल्या अनेक ग्राहकांवर सध्या ही वेळ आली आहे. कुठलाही SMS नाही, ओटीपी नाही तरीही अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे गायब झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, मुदत ठेव आणि बचत खात्यांमधून तब्बल ३५ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. या वृत्तानंतर बँकिंग आणि ग्राहक वर्गात खळबळ उडाली आहे.

ना मॅसेज, ना सही… खात्यातील शिल्लक अचानक ‘शून्य’!

धक्कादायक म्हणजे बँक खात्यातून पैसे काढल्याचा कोणताही संदेश ग्राहकांना आला नाही, की ग्राहकांनी कोणत्याही कागदपत्रावर सही केलेली नसताना हे पैसे परस्पर वर्ग करण्यात आले आहेत. पीटीआयशी बोलताना स्थानिक रहिवासी हनीफ खान यांनी सांगितले, “माझ्या बचत खात्यात ३९ लाख रुपये होते. पण आता खात्यात एक रुपयाही दिसत नाही. मी कोणत्याही पैशांच्या व्यवहारासाठी सही केली नव्हती, ना मला बँकेकडून कोणताही मॅसेज आला.”

८८ लाखांवरून शिल्लक थेट १ लाखावर

या घोटाळ्यामुळे सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विमातळासाठी सरकारने संपादित केल्या आहेत. त्याचा कोट्यवधी रुपयांचा परतावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. विजेंद्र सिंग या स्थानिक शेतकऱ्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांना जमिनीचा मोबदला म्हणून ८८ लाख रुपये मिळाले होते. आता खात्याची केवळ १ लाख रुपयेच शिल्लक असल्याचे दिसत आहे.

चहा-समोसे विकणाऱ्या ६० वर्षीय महिलेचे १.१८ कोटी गायब

‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, बिरोंडा गावातील एका ६० वर्षीय महिलेची जमीन जेवर विमानतळ प्रकल्पासाठी संपादीत केली होती. चहा आणि समोसे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेच्या खात्यात १.२९ कोटी रुपयांचा मोबदला जमा झाला होता. मात्र, जेव्हा त्यांच्या मुलाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खात्यातून १.१८ कोटी रुपये गायब असल्याचे उघडकीस आले. ही रक्कम त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा भविष्यातील एकमेव आधार होती.

शाखेत गेल्यावरच समजला फ्रॉड

झाकीर नावाच्या दुसऱ्या एका खातेदाराने त्यांच्या खात्यातून ९.५ लाख रुपये गायब झाल्याचा आरोप केला आहे. बँकेत जाऊन प्रत्यक्ष पासबुक आणि बॅलन्स तपासल्यानंतरच हा प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

बँक प्रशासनाची कारवाई

या घटनेनंतर संतप्त खातेदारांनी बँकेच्या शाखबाहेर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने तातडीने पावले उचलत ऐच्छर शाखेच्या व्यवस्थापकासह संशयित कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास ग्रेटर नोएडा येथील बेटा-२ पोलीस करत आहेत. दरम्यान, ग्राहकांच्या सर्व तक्रारींचे निवारण केले जाईल आणि चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन बँक अधिकाऱ्यांनी दिले आहे.