PVR Inox Smart Cinema Ticket small towns plan: भारतातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स साखळी असलेल्या ‘पीव्हीआर आयनॉक्स’ने (PVR INOX) लहान शहरांमध्ये परवडणाऱ्या दरातील चित्रपटगृहे सुरू करण्याची आणि या चित्रपटगृहांमधील तिकिटांचे दर १८९ रुपये इतके मर्यादित ठेवण्याची योजना आखली आहे.

मुझफ्फरपूर, बॅरकपूर आणि हनुमानगड यांसारख्या शहरांमध्ये पुढील तीन वर्षांत ३०० ‘स्मार्ट सिनेमा’ हॉल सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ब्लूमबर्ग न्यूजला दिलेल्या मुलाखतीत कंपनीचे कार्यकारी संचालक संजीव कुमार बिजली यांनी सांगितले की, या चित्रपटगृहांची मालकी फ्रँचायझी भागीदारांकडे असेल, तर त्यांचे संचालन ‘पीव्हीआर आयनॉक्स’द्वारे केले जाईल.

पॉपकॉर्न आणि नाचोसच्या किमतीही कमी

बिजली म्हणाले की वाढीची पुढील लाट या शहरांमधून येईल, जिथे लोक महत्त्वाकांक्षी आहेत आणि मोठ्या शहरांप्रमाणेच त्यांना सुविधा हव्या आहेत. नवीन चित्रपटगृहांमधील तिकिटांची किंमत १८९ रुपयांपर्यंत असेल, जी महानगरांमधील सरासरी तिकीट किमतीपेक्षा सुमारे ४० टक्के कमी आहे. पॉपकॉर्न आणि नाचोस सारख्या लोकप्रिय खाद्यदार्थ्यांच्या किमतीही कमी असतील.

लहान शहरांमध्ये जमीन, भांडवली खर्च, वीज आणि मनुष्यबळासाठीच्या कमी खर्चामुळे हे मॉडेल फायदेशीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बॉक्स ऑफिसवर तेजीची अपेक्षा

ही योजना म्हणजे PVR Inox च्या महसुलाचे स्रोत केवळ मोठी शहरे आणि पारंपरिक चित्रपट प्रदर्शनांपलीकडे विस्तारण्याच्या धोरणाचाच एक भाग आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’, ‘प्रोजेक्ट हेल मेरी’, ‘द ओडिसी’ आणि ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ यांसारख्या अलीकडील चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिसवर सध्या चांगली स्थिती असतानाच ही योजना आखण्यात आली आहे. ‘टॉक्सिक’, ‘रामायण’ आणि ‘ड्युन: पार्ट थ्री’ यांसारखे आगामी चित्रपट ही गती कायम राखतील अशी अपेक्षा आहे.

चित्रपटांशिवाय इतर कार्यक्रमांतून कमाई

‘स्मार्ट सिनेमा’च्या विस्ताराइतकेच, कंपनी पुढील तीन ते चार वर्षांत दरवर्षी सुमारे १५० नियमित स्क्रीन्सची भर घालणार आहे. तसेच, अधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी मल्टिप्लेक्समध्ये ‘फोटो बूथ्स’ आणि ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी गेम्स’ची चाचणीही घेतली जात आहे.

बॉक्स ऑफिसवरील कमाईवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी, PVR Inox क्रीडा सामन्यांचे थेट प्रक्षेपण, संगीत मैफिलींचे प्रसारण, ‘टेड टॉक्स’, धार्मिक कार्यक्रम आणि कॉर्पोरेट बैठका यांसारख्या पर्यायी कार्यक्रमांचा विस्तार करत आहे. गेल्या वर्षी अशा पर्यायी कार्यक्रमांमुळे सुमारे १२ लाख प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवली गेली होती आणि या वर्षी त्यात १०% वाढ होण्याची अपेक्षा आहे.