Sugar Price Hike Limit Purchase : जगातील साखर उत्पादनासाठी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतातच साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. आगामी काळात भारतात सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत. अशा परिस्थिती साखरेची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि किरकोळ विक्रेत्यांनी साखर विक्रीवरच मर्यादा आणल्या आहेत. इकॉनॉमिक टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
फक्त ५ किलोच साखर मिळणार?
साखरेचा तुटवडा निर्माण झाल्याने किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बिगबास्केट, ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इन्स्टामार्ट यासारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सने साखरेच्या विक्रीवर मर्यादा आणली आहे. तर, डी मार्टसारख्या रिटेल स्टोअर्सनेही साखरेच्या उपलब्धतेवरून चिंता निर्माण करून विक्रीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार, दिल्ली-एनसीआर भागात ब्लिंकिटवर ग्राहक काही विशिष्ट ब्रँडसाठी प्रत्येकी ५ किलोची जास्तीत जास्त एकच पिशवी खरेदी करू शकतात, तर इतर ठिकाणी हे नियम वेगळे आहेत.
उदाहरणार्थ, पुण्यात ब्लिंकिट काही विशिष्ट साखर ब्रँडच्या १ किलोच्या केवळ तीनच पिशव्या कार्टमध्ये जोडण्याची परवानगी देत आहे. बिगबास्केटने विशिष्ट ब्रँडच्या १ किलोच्या जास्तीत जास्त पाच पिशव्यांपर्यंत खरेदी मर्यादित केली आहे. दिल्ली-एनसीआरमधील स्विगी इन्स्टामार्टवरही साखरेच्या खरेदीवर मर्यादा घालण्यात आली असून, काही ठिकाणी ग्राहकांना १ किलो साखरेच्या केवळ दोनच पिशव्या ऑर्डर करण्याची मुभा आहे. झेप्टो आणि इतर किरकोळ विक्रेत्यांनीही मालाचा साठा व्यवस्थापित करण्यासाठी आणि साखर पूर्णपणे संपू नये यासाठी अशाच प्रकारचे निर्बंध लादले आहेत.
साखरेची किंमत ६४ रुपयांवर
दरम्यान, दरवाढ रोखण्यासाठी सरकारने अलीकडेच घेतलेल्या उपायांचे परिणाम दिसू लागल्याने किरकोळ बाजारात साखरेच्या किमतीची घोडदौड सुरूच असून, साखर प्रति किलो ६४ रुपयांवर पोहोचली आहे. सोमवारी साखरेची सरासरी किंमत ६३ रुपये रुपये प्रति किलो होती. उपभोक्ता व्यवहार मंत्रालयाच्या (किंमत नियंत्रण विभाग) आकडेवारीनुसार, २५ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात साखरेचा सरासरी दर ६३.९७ रुपये प्रति किलोवर पोहोचला, जो एका महिन्यापूर्वीच्या ४८.८१ रुपये प्रति किलो दरापेक्षा ३१ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्यावर्षी ४६.३१ रुपये प्रती किलो साखर होती. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३८ टक्क्यांनी साखरेच्या किमतीत वाढ झाली आहे.
आकडेवारीनुसार, सोमवारी साखरेची कमाल विक्री किंमत ७६ रुपये प्रति किलो होती, तर बहुतांश ठिकाणी असणारा दर ६५ रुपये प्रति किलो होता. सरकार आणि साखर उद्योग संघटनांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांत कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या साखरेचे दर कमी झाले आहेत. मात्र, त्याचा परिणाम अद्याप किरकोळ बाजारात दिसणं बाकी आहे. गेल्या एका महिन्यात किरकोळ किमतीत झपाट्याने वाढ झाल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. आकडेवारीनुसार, सोमवारी साखरेचा घाऊक दर ५९.२३ रुपये प्रति किलो होता, जो एका महिन्यापूर्वी ४५.३५ रुपये आणि एका वर्षापूर्वी ४३.०१ रुपये प्रति किलो होता.
