R Ashwin-Rahul Dravid Business Partners: फिरकीपटू आर. अश्विन सुमारे १५ वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत भारताच्या आघाडीच्या फिरकी गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगनंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांच्या फळीचे त्याने नेतृत्त्व केले. आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ७०० हून अधिक बळी घेत त्याने १८ डिसेंबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्येही दमदार कामगिरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल खेळत असतानाच आर. अश्विनने आपली क्रिकेटनंतरचे आर्थिक भविष्य निश्चित केले होते. त्याने निवृत्तीपूर्वी आणि निवृत्तीनंतरही अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. या व्यवसायांमध्ये अश्विनची काय भूमिका आहे, ते व्यवसाय कोणते आहेत आणि राहुल द्रविड आणि आर. अश्विन कसे बिझनेस पार्टनर्स आहेत ते जाणून घेऊया.
गुंतवणूक
आर. अश्विन याच्या वडिलांनी २०१२ मध्ये जेन-नेक्स्ट क्रिकेट इन्स्टिट्यूटची स्थापनी केली आहे. ती २०१७ मध्ये नोंदणीकृत झाली. इन्स्टिट्यूटची चेन्नईमध्ये सहा केंद्रे आहेत. तसेच शारजाहमध्येही एक केंद्र आहे. शिवाय, युकेमधील मेडनहेड येथेही एक केंद्र आहे. तिथे अश्विन व्हिडिओ अॅनालायसिससारख्या विषयांवर धडे देतो.
आर. अश्विनने २०१८ मध्ये टर्फ टाऊनची सह-स्थापना केली. ही कंपनी चेन्नईमध्ये एक स्पोर्ट्स मॅचमेकिंग ॲप चालवते. याद्वारे फुटबॉल, क्रिकेट आणि बॅडमिंटनसाठी मैदाने आणि कोर्ट शोधता येतात. यासह यावर विविध खेळासाठी पार्टनर्सही शोधता येतात.
दक्षिण आफ्रिकेत गुंतवणूक
अश्विन २०२२ मध्ये भारताच्या टी-२० आणि एकदिवसीय संघातून बाहेर फेकला गेला होता. परंतु, कसोटी संघात तो भारताचा पहिल्या पसंतीचा फिरकी गोलंदाज होता. याच दरम्यान त्याने दक्षिण आफ्रिकन फिनटेक कंपनी क्विलीमध्ये गुंतवणूक केली. यामध्ये त्याने E4EAfrica आणि Next Chymia Consulting सोबत सह-गुंतवणूक केली आहे. ही कंपनी मोबाईल डेटा, वीज आणि विमा यासारख्या डिजिटल सेवा पुरवते.
पुढे जून २०२४ मध्ये आर. अश्विनने मस्केटियर्स स्पोर्ट्स अरेनास मध्ये गुंतवणूक केली. अश्विनची पत्नी प्रीती हा उपक्रम धीरज बोथरा आणि शैलेश कुमार यांच्या साथीने चालवते.
चेन्नई सुपरकिंग्ज
अश्विन जून २०२४ मध्ये सुपरकिंग व्हेंचर्सच्या माध्यमातून ‘इंडिया सिमेंट्स’ समूहात पुन्हा रुजू झाला. नवलूर येथील सीएसकेचे हाय-परफॉर्मन्स सेंटर आहे. तिथे तो गुणवंतांची निवड, फिरकी गोलंदाजीचे विशेष कार्यक्रम आणि तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करतो.
व्हीओसी ऑटोमोटिव्ह
आर. अश्विनने एप्रिल २०२५ मध्ये व्हीओसी ऑटोमोटिव्ह या कंपनीत गुंतवणूक केली आहे. तसेच तो कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडरही बनला आहे. ही कंपनी दुचाकी सर्व्हिसिंगचे काम करते. कंपनीचे देशभरात १५० आऊटलेट्स आहेत. आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत ३०० आऊटलेट्स आणि ५० कोटी रुपयांचा महसूल गाठणे हे कंपनीचे लक्ष्य आहे. या कंपनीची स्थापना २०१९ मध्ये व्यंकटेश बी एम आणि लोकेश एस यांनी केली.
अश्विन-द्रविड बिझनेस पार्टनर्स
मार्च २०२६ मध्ये आर. अश्विनने भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडसह आयसीसी मान्यताप्राप्त युरोपियन टी२० प्रीमियर लीगमध्ये ‘डब्लिन गार्डियन्स’ ही फ्रँचायझी १० वर्षांसाठी पंधरा दशलक्ष डॉलर्सला विकत घेतली आहे.
आर. आश्विनची एकूण संपत्ती
आर. अश्विनची एकूण संपत्ती १३२ कोटी असल्याचा अंदाज आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे १० कोटी रुपये आहे. आंतरराष्ट्री क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी बीसीसीआयकडून त्याला ५ कोटी रुपये मानधन मिळत होते. तर अश्विनने त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. त्यासाठी त्या ९.७५ कोटी रुपये मानधन मिळाले होते. त्याची आयपीएलमधील एकूण कमाई ८२ ते १०० कोटींच्या दरम्यान आहे.
मालमत्तांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आर. अश्विनचे तमिळनाडूच्या पश्चिम माम्बलममध्ये एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत ९ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. जागतिक स्तरावर त्याची २६ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्याच्याकडे ७ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या गाड्या आहेत. यामध्ये ६ कोटी रुपयांची रोल्स-रॉयस घोस्ट आणि ९३ लाखांची ऑडी क्यू७ यांचा समावेश आहे.
