Praggnanandhaa Annual Cost To Play Modern Chess: भारताचा ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने नुकतेच बुद्धिबळ जगतातल्या नॉर्वे चेस या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे जेतेपद मिळवत इतिहास रचला. या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा प्रज्ञानंद हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. २० वर्षांच्या प्रज्ञानंदने जर्मनीच्या विन्सेंट केमर याला नमवत प्रज्ञानंदने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. प्रज्ञानंदच्या या विजयानंतर त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च दर्जाची कामगिरी करण्यासाठी लागणाऱ्या सुविधांच्या खर्चाची चर्चा होऊ लागली आहे.
अनेक दशकांपासून भारतीय बुद्धिबळपटू व्यावसायिकदृष्ट्या एकाकी होते. ग्रँडमास्टर्सना मूलभूत प्रशिक्षण आणि प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. प्रेक्षकांना सर्वोच्च स्तरावर पाहण्यासाठी एका खेळाडूची गरज होती. प्रज्ञानानंद तोच चेहरा बनला. त्याने वयाच्या १२ व्या वर्षी जिंकलेल्या ग्रँडमास्टर स्पर्धेमुळे ब्रँड्सना गुंतवणुकीसाठी एक संधी मिळाली.
बुद्धिबळाला बौद्धिक विकास आणि स्पर्धात्मक खेळाचे एक फलदायी मिश्रण मानणाऱ्या शिक्षण केंद्रित पालकांनी आपल्या मुलांना अकादमींमध्ये दाखल करण्यास सुरुवात केली. कॉर्पोरेट ब्रँड्ससाठी, या बदलामुळे एक अशी गोष्ट निर्माण झाली, जिला आता मार्केटिंग करणारे ‘स्मार्ट-किड हॅलो’ म्हणतात.
बँकिंग, वित्तीय सेवा, शिक्षण-तंत्रज्ञान (एड-टेक) आणि ग्राहक-वस्तू क्षेत्रातील जाहिरातदारांनी बुद्धिबळातील ग्रँडमास्टर्सकडे अत्यंत विश्वासार्ह आणि कमी जोखीम असलेले ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून पाहण्यास सुरुवात केली. याचा पहिला मोठा लाभ खुद्द प्रज्ञानंदला झाला. जानेवारी २०२४ मध्ये त्याने अदाणी समूहाशी करार केला. या भागीदारीमुळे त्याला स्वतःसाठी एक उच्च-स्तरीय कामगिरी करणारा प्रशिक्षण संघ उभारण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक स्थैर्य मिळाले. या संघात उत्कृष्ट प्रशिक्षक, सहाय्यक विश्लेषक आणि फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश होता.
त्याने आणि त्याची बहीण वैशालीने आयटीसी क्लासमेटच्या (ITC Classmate) एज्युगेम्स मोहिमेचे नेतृत्व केले. या मोहिमेद्वारे लेखनसाहित्याच्या उत्पादनांना ‘बौद्धिक क्षेत्रातील विजेत्यांची साधने’ म्हणून सादर करण्यात आले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने त्याच्याशी ठराविक कालावधीचा करार केला आणि या माध्यमातून भारतीय बुद्धिबळाची वाढती राष्ट्रीय प्रतिष्ठा व या सरकारी उपक्रमाची सांगड घातली.
भारतीय बुद्धिबळपटूंची कमाई
भारतीय बुद्धिबळपटूंसाठी सध्या अस्तित्वात असलेली दर रचना (Rate Card) त्यांनीच घालून दिलेल्या मानकांवर आधारित आहे. डी. गुकेशसारख्या अव्वल दर्जाच्या ग्रँडमास्टरसाठी वार्षिक भागीदारीचे मानधन १ ते २ कोटी रुपयांच्या घरात आहे, तर सोशल मीडियावरील एका रीलसाठी त्याला ३ ते ६ लाख रुपये मिळतात.
प्रज्ञानंद याच वार्षिक उत्पन्न श्रेणीत मोडतो, मात्र त्याच्या रील्ससाठी १.५ ते ३ लाख रुपये मिळतात. नागपूरची प्रतिभावान बुद्धीबळपटू दिव्या देशमुखचे वार्षिक उत्पन्न ४० ते ७० लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे मानले जाते आणि तिच्या रील्सचे दर २ ते ४ लाख रुपये आहेत. अगदी मध्यम श्रेणीतील ग्रँडमास्टरही वर्षाला १० ते २५ लाख रुपये कमवू शकतो.
प्रज्ञानानंदला त्याच्या प्रायोजकत्वातून नेमके काय मिळते हे अचूकपणे माहीत आहे. “बुद्धिबळाचे प्रशिक्षण सोपे आणि स्वस्त वाटू शकते, पण प्रवास आणि इतर साधनसामग्रीमुळे हा एक खूप महागडा खेळ आहे”, असे तो एकदा म्हणाला होता.
सरावासाठी करोडो रुपयांचा खर्च
ग्रँडमास्टर स्तरावरील आधुनिक बुद्धिबळ हा एक शारीरिक कसरतीचा प्रकार आहे. कॅन्डिडेट्ससारख्या १४ फेऱ्यांच्या क्लासिकल स्पर्धेत पाच ते सहा तासांचे सामने खेळावे लागतात. उत्तम शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी, प्रज्ञानानंद बॅडमिंटन आणि बीच व्हॉलीबॉल खेळतो. त्याची तयारी बुद्धिबळाच्या पटापलीकडे खूप विकसित झाली आहे.
बुद्धिबळाचे रूपांतर आता एका संगणकीय शस्त्रास्त्र स्पर्धेत झाले आहे. सुरुवातीच्या चालींची रणनीती तयार करण्यासाठी आणि सामन्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी, उच्च दर्जाचे खेळाडू स्टॉकफिश आणि लीला चेस झिरो सारख्या चेस इंजिनवर अवलंबून असतात. उच्चस्तरीय स्पर्धेत टिकून राहणारे नवीन डावपेचांचे मार्ग शोधण्यासाठी, खेळाडूला प्रति सेकंद एक अब्ज नोड्सवर चालणाऱ्या इंजिनची आवश्यकता असते.
या वेगाशी जुळणारा एक प्रत्यक्ष होम सर्व्हर घेण्यासाठी सुरुवातीला अंदाजे १.७२ कोटी रुपये भांडवल लागते, शिवाय विशेष कूलिंग आणि तांत्रिक सहाय्याचा खर्च वेगळा. यामुळे प्रायोजित खेळाडू आणि स्वत:च्या खर्चावर खेळणारे खेळाडू यांच्यात एक तांत्रिक दरी निर्माण झाली आहे.
आता क्लाउड कंप्युटिंगकडे कल वळला आहे. चेसिफायसारखे सबस्क्रिप्शन-आधारित प्लॅटफॉर्म उच्च-कार्यक्षमतेचे सर्व्हर अॅरे भाड्याने देतात. प्रति सेकंद एक अब्ज नोड्सची सुविधा देणाऱ्या एका एलिट क्लाउड पॅकेजसाठी पाचशे तासांच्या वापराकरिता प्रति वर्ष अंदाजे १७.२ लाख रुपये खर्च येतो.
प्रज्ञानंदची वार्षिक कमाई
चेन्नईच्या प्रज्ञानंदची वार्षिक कमाई ५ कोटी रुपयांपर्यंत आहे, हे समोर आल्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत हालचाल सुरू झाली. याचे परिणाम आता भारतीय बुद्धिबळ क्षेत्राच्या संपूर्ण व्यवस्थेत दिसून येत आहेत. टेक महिंद्रा आणि फिडे (FIDE) यांच्या संयुक्त उपक्रमाने, कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकीच्या सहा फ्रँचायझींच्या माध्यमातून फ्रँचायझी आधारित सांघिक बुद्धिबळ भारतात आणले.
या लीगला विविध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर एक कोटीहून अधिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला असून, सोशल मीडियावर तिला १०० कोटींहून अधिक व्हिव्ज मिळाले आहेत. या लीगचे हंगामी प्रायोजकत्व मूल्य ३ ते ४ कोटी रुपये इतके आहे.
या काही केवळ योगायोगाच्या गोष्टी नाहीत. ही अशा बाजारपेठेची लक्षणे आहेत, जिने विश्वनाथन आनंद यांच्याव्यतिरिक्त व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरणारा पहिला भारतीय स्टार खेळाडू शोधला आहे. प्रज्ञानंदने केवळ सामने जिंकले नाहीत, तर अशा गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो, हेही त्याने सिद्ध करून दाखवले.
