Raghuram Rajan Federal Reserve appointment And Indian global leadership success: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’च्या ६.७ ट्रिलियन डॉलर्सच्या ताळेबंदाचा (बॅलन्स शीट) आढावा घेण्यासाठी झालेली नियुक्ती हा सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या निमित्ताने केवळ एका मोठ्या पदाचीच नव्हे, तर सामान्य भारतीय नागरिकांची कार्यसंस्कृती आणि कामाची पद्धत जागतिक स्तरावर का पसंतीस पडते, याचाही आढावा घेतला जात आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आर्थिक विश्लेषक असलेल्या विंटेज झाची नावाच्या एका युजरने नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “मी अलीकडेच बातम्यांमध्ये वाचले की, भारतीय वंशाचे प्राध्यापक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’च्या ६.७ ट्रिलियन डॉलर्सच्या ताळेबंदाचा आढावा घेण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.”

“मला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की, सामान्य भारतीयांची अशी कोणती कार्यसंस्कृती आहे, ज्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर अशा महत्त्वपूर्ण आणि आकर्षक संधींसाठी पसंती दिली जाते. मला याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल”, असे हा युजर पोस्टच्या शेवटी म्हणाला.

रघुराम राजन यांच्यासारख्या दिग्गज अर्थतज्ज्ञाला मिळालेली ही जागतिक जबाबदारी ही केवळ त्यांच्या वैयक्तिक कौशल्याची पावती नसून, ती भारतीय शिक्षण पद्धती, कठोर परिश्रमाची तयारी आणि उच्च बौद्धिक क्षमतेची साक्ष आहे. भारतात वाढताना आणि काम करताना लोकांना अनेकदा विविध गोष्टींची कमतरता आणि अचानक बदलणाऱ्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. या आव्हानात्मक वातावरणातून मार्ग काढण्याची लवचिकता भारतीय लोकांच्या स्वभावातच असते. मर्यादित साधनांमध्ये सर्वोत्तम काम करण्याचे हे कौशल्य त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संकटमोचक म्हणून सिद्ध करते.

याचबरोबर भारत हा विविधतेने नटलेला देश असल्याने एकाच वेळी विविध भाषा, संस्कृती आणि पार्श्वभूमीच्या लोकांसोबत जुळवून घेणे भारतीयांना सहज जमते. जागतिक संस्थांमध्ये काम करताना हा गुण नेतृत्व करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. भारतीय कार्यसंस्कृतीत नातेसंबंध, प्रामाणिकपणा आणि दीर्घकालीन विकासावर भर दिला जातो. केवळ तात्कालिक फायद्याचा विचार न करता भविष्याचा विचार करण्याची त्यांची तयारी कॉर्पोरेट जगतात त्यांना आघाडीवर ठेवते.

थोडक्यात सांगायचे तर, रघुराम राजन यांचे हे यश आणि सामान्य भारतीयांची काम करण्याची कष्टाळू पद्धत ही आज जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक संपत्ती ठरत आहे. याच गुणांमुळे जगभरात आज भारतीय प्रतिभेला झुकते माप दिले जात आहे.

अमेरिकेतील प्रमुख कंपन्यांचे भारतीय वंशाचे सीईओ

सत्या नडेला: मायक्रोसॉफ्ट

सुंदर पिचाई: अल्फाबेट, गुगलची पालक कंपनी

शंतनू नारायण: ॲडोबी

अरविंद कृष्णा: आयबीएम

निकेश अरोरा: पालो अल्टो नेटवर्क्स

नील मोहन: यूट्यूब

संजय मेहरोत्रा: मायक्रॉन टेक्नॉलॉजी

रेवती अद्वैथी: फ्लेक्स लिमिटेड

जॉर्ज कुरियन: नेटॲप

अनिरुद्ध देवगण: केडन्स डिझाइन सिस्टीम्स