Raghuram Rajan Net Worth: २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीचा अचूक अंदाज वर्तवणारे अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी कृत्रीम बुद्धिमत्तेबाबतच्या (एआय) शेअर बाजारातील अतिउत्साहावर नुकताच एक लेख लिहिला आहे. या लेखात रघुराम राजन यांनी एआय बाबत काही गंभीर इशारे दिले आहेत. यामुळे रघुराम राजन सध्या चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे शिक्षण, जागतिक अर्थ क्षेत्रातील त्यांची कारकिर्द आणि त्यांची सपत्ती याचा आढावा घेऊया.

जन्म आणि शिक्षण

रघुराम राजन यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९६३ रोजी भोपाळ येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आर. गोविंदराजन असे होते. ते भारताचे माजी गुप्तचर अधिकारी होते. रघुराम राजन यांनी दिल्लीतील ‘दिल्ली पब्लिक स्कूल: आर. के. पुरम’ येथे शिक्षण घेतले आणि त्यानंतर ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (IIT) मधून विद्युत अभियांत्रिकीमध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिथे त्यांनी १९८५ मध्ये ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ म्हणून सुवर्णपदक’ जिंकले. तसेच, १९८७ मध्ये त्यांनी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद’ (IIM-A) मधून एम.बी.ए. ची पदवीही प्राप्त केली.

रघुराम राजयन यांनी पुढे अमेरिकेतील MIT च्या स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून पीएच.डी. चे शिक्षण पूर्ण केले. १९९१ मध्ये त्यांनी ‘Essays on Banking’ हा आपला प्रबंध यशस्वीरित्या पूर्ण केला. यासाठी त्यांना व्यवस्थापनशास्त्रातील डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान

रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सप्टेंबर २०१३ मधील किरकोळ महागाईचा दर ९.८% वरून जुलै २०१५ मध्ये ३.७८% पर्यंत खाली आणण्यात त्यांना यश मिळवले. जो १९९० च्या दशकानंतरचा सर्वात नीचांक होता.

भारताचा परकीय चलन साठा (Forex Reserve) त्यांच्या कार्यकाळात सुमारे ३० टक्क्यांनी अधिक भक्कम झाला होता. त्यांच्या बहुतेक सुधारणा आणि धोरणांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जाते. पण, व्याजदर आणि महागाईच्या मुद्द्यांवर राजन यांच्यावर टीकाही झाली आहे. जेव्हा त्यांच्याकडे आरबीआय गव्हर्नरपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती, त्या वेळी देशाला भेडसावणाऱ्या महागाईचा सामना करण्यासाठी त्यांनी अवलंबलेल्या पुरोगामी आणि व्यावहारिक दृष्टिकोनासाठी ते ओळखले जातात.

रघुराम राजन यांचे अमेरिकन अर्थव्यवस्थेतील योगदान

भारताबरोबरच रघुराम राजन यांनी अमेरिकेच्या अर्थशास्त्र क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. यामध्ये २००७-२००८ च्या आर्थिक मंदीची, तसेच २००८ ते २०१२ या काळात अमेरिकेला अनुभवाव्या लागलेल्या आर्थिक अस्थिरतेची त्यांनी वर्तवलेली भाकिते यांचा समावेश आहे. सुरुवातीला त्यांच्या या भाकितांवरून त्यांची खिल्ली उडवली गेली होती. परंतु जेव्हा अमेरिका आणि युरोपमध्ये प्रत्यक्ष आर्थिक संकट उभे राहिले, तेव्हा त्यांची भाकिते खरी ठरली आणि जागतिक अर्थशास्त्रज्ञांच्या पंक्तीत त्यांचे स्थान भक्कम झाले. २०१६ मध्ये, ‘टाइम’ (Time) मासिकाने जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश केला.

रघुराम राजन यांची संपत्ती

रघुराम राजन यांच्या एकूण संपत्तीचा (Net Worth) अंदाज घेण्यासाठी, अर्थतज्ज्ञ, लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि धोरण सल्लागार अशा त्यांच्या विविध भूमिकांचा विचार करणे आवश्यक ठरते. बाजारातील मूल्यमापन आणि त्यांनी भूषवलेली पदे यांनुसार अचूक आकडेवारीमध्ये जरी तफावत असली, तरी अंदाजांनुसार त्यांची संपत्ती ४२ कोटी ते ६७ कोटी रुपयांच्या (५ ते ८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) दरम्यान असल्याचे मानले जाते.