Raghuram Rajan analyzes Indian economy and Cockroach Janata Party popularity: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन सातत्याने भारतासह जगभरातील आर्थिक घडामोडींवर भाष्य करत असतात. आता नुकतेच राजन यांनी इराण-अमेरिका युद्धामुळे भारताला बसलेला कच्च्या तेलाचा फटका, भारतासमोरील पुढील आव्हाने, बेरोजगारी आणि कॉकरोच जनता पार्टी यासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
भारतात सध्या तेलाच्या धक्क्यामुळे एक प्रकारची चलनवाढ आणि मंदीची कोंडी निर्माण झाली आहे. महागाई वाढली आहे आणि विकासदर दबावाखाली आहे. अशा परिस्थितीतही आरबीआयने व्याजदर स्थिर ठेवले आहेत. रघुराम राजन यांनी नुकतीच ईटी नाऊ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यामध्ये, ‘आज जर तुम्ही गव्हर्नर असता, तर अशा परिस्थितीत तुम्ही चलनविषयक धोरण कसे हाताळले असते?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
रघुराम राजन या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, “जर जीडीपी ७.७ टक्के असेल, तर त्या अर्थव्यवस्थेची म्हणजेच भारताची क्षमता साधारणपणे ७ टक्के इतकी आहे असे मी म्हणेन. त्यामुळे जर जीडीपी ७.७ टक्के असेल, तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक वेगाने प्रगती करत आहात.”
“पण तरीही जेव्हा आपण या गोष्टी पाहतो तेव्हा आपल्याला कमकुवतपणाची लक्षणेही दिसतात. रोजगाराच्या आघाडीवर पाहता, आपण पुरेशा प्रमाणात रोजगार निर्माण करत नाही आहोत. यामुळेच कॉकरोच जनता पार्टीसारख्या पक्षांकडे लोकांचा जो ओढा आहे, त्याचे काही अंशी स्पष्टीकरण मिळते”, असे रघुराम राजन कॉकरोच जनता पार्टीचा उल्लेख करत म्हणाले.
या प्रकारच्या आर्थिक वाढीला…
रघुराम राजन पुढे म्हणाले, “जेव्हा आपण गुंतवणुकीसारख्या क्षेत्रांकडे पाहतो, तेव्हा असे दिसून येते की, या प्रकारच्या आर्थिक वाढीला साजेसी अशी खासगी गुंतवणूक होत नाहीये. याचा अर्थ असा होतो की अर्थव्यवस्थेत अतिरिक्त क्षमता आहे. गेल्या काही वर्षांत कोअर इन्फ्लेशन (मूलभूत महागाई) तुलनेने कमी राहण्यामागे हे देखील एक कारण आहे. ७.७ टक्के दराने विकास होत असतानाही आपल्याकडे अतिरिक्त क्षमता कशी काय असू शकते? याचे नेमके उत्तर काय आहे, हे मला माहीत असते तर बरे झाले असते. त्यामुळे अधिक चांगली चलनविषयक धोरणे आखणे शक्य होईल. म्हणजेच, स्थूल-आर्थिक आकडेवारीशी चलनविषयक धोरणाचा योग्य ताळमेळ घालता येईल. दुर्दैवाने, या बाबतीत आपली नेमकी स्थिती काय आहे, याची मला कल्पना नाही.”
भारतातील बेरोजगारी
सांख्यिकी मंत्रालयाने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या ताज्या पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेनुसार, १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी भारताचा बेरोजगारीचा दर मे महिन्यात ५.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. एप्रिलमध्ये हा दर ५.२ टक्के होता. ग्रामीण भागात बेरोजगारी वाढल्यामुळे ही वाढ दिसून आली आहे.
पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमधील बेरोजगारी वाढल्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर मे महिन्यात ५.१ टक्क्यांवर गेला, जो आधीच्या महिन्यात ४.६ टक्के होता. याउलट, शहरी भागातील बेरोजगारीचा दर एप्रिलमधील ६.६ टक्क्यांवरून किंचित कमी होऊन ६.४ टक्क्यांवर आला आहे. शहरी भागातील पुरुषांमधील बेरोजगारीचा दर ५.९ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे, तर महिलांमधील बेरोजगारीचा दर ८.५ टक्क्यांवरून घसरून ८.२ टक्क्यांवर आला आहे.
