Raghuram Rajan On Indian Economy, Rupee Fall vs Dollar And GDP Growth: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांच्या मते, अमेरिका-इराण युद्धामुळे व्यापाराचे एकूण प्रमाण कमी झाले नसले तरी, जागतिक अर्थव्यवस्था विस्कळीत झालेले व्यापारी मार्ग, टॅरिफ वॉर आणि भू-राजकीय तणावाचे धक्के अजूनही पचवत आहे.
ईटी नाऊशी बोलताना राजन यांनी असा युक्तिवाद केला की, होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट आणि अमेरिकेच्या टॅरिफ कारवाईसह या सर्व व्यत्ययांचा एकत्रित परिणाम, विविध देश आर्थिक लवचिकतेबद्दल कसा विचार करतात याला नव्याने आकार देईल.
इंधन सुरक्षेबाबत बोलताना रघुराम राजन म्हणाले, “अमेरिका-इराण यांच्यातील सांभाव्य शांतता करार होर्मुझ व्यत्ययाने निर्माण झालेली इंधन असुरक्षा नाहीशी करेलच असे नाही. भारताच्या क्रूड, एलएनजी आणि एलपीजी आयातीमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा मोठा वाटा आहे आणि भारताला सध्या आहे त्यापेक्षा खूप मोठ्या धोरणात्मक तेलाच्या साठ्याची गरज आहे.”
रघुराम राजन यांनी पुढे इंधनाच्या पर्यायांच्या गरजेकडेही लक्ष वेधले. ते म्हणाले, “चीन ज्या प्रमाणे कोळशाचे उत्पादन घेत आहे त्या मार्गावर आपणही जायला हवे. तसेच अक्षय्य उर्जेसाठी दीर्घकालीन प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण, अक्षय ऊर्जेची पुरवठा साखळी जोखीमीची आहे, कारण भारत अजूनही मोठ्या प्रमाणात आयातित सौर सेल आणि पवन घटकांवर अवलंबून आहे आणि भारतीय उद्योगांना देशांतर्गत पर्याय तयार करण्यात मोठी भूमिका घेणे महत्त्वाचे आहे.”
यावेळी रघुराम राजन यांनी डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयावरही भाष्य केले. जो दोन वर्षांत डॉलरच्या तुलनेत जवळपास १४% घसरला आहे. त्यांनी या घसरणीचा संबंध केवळ तेलाच्या किमतींशी न जोडता एका रचनात्मक समस्येशी जोडला. परदेशातून येणारा पैसा वाढत असूनही, भारतात पुरेसी थेट परदेशी गुंतवणूक येत नाही, असे त्यांनी म्हटले.
देशात जीडीपी वाढीचे मथळे झळकत आहेत, मग त्या प्रमणात देशात गुंतवणूक का झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थिती केला. याला त्यांनी “कृती” आणि “उक्ती” मधील अंतर म्हणत सरकारला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
राजन यांनी शेवटी सांगितले की, जर जागतिक स्तरावर तेलाच्या किमती सध्याच्या प्रति बॅरल सुमारे ८५ डॉलर पातळीवर राहिल्यास भारताच्या चालू खात्याची स्थिती चिंताजनक नसून तुलनेने सौम्य असेल.
पुढील धोका तेल नसून…
भविष्याच्या दृष्टीने पाहता, राजन यांनी भारताला महत्त्वाच्या वस्तूंच्या जोखमीबाबत तीन ते पाच वर्षांचा दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, पुढील धोका तेल नसून जेनेरिक औषधांच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे औषधनिर्माण क्षेत्रातील कच्चा माल असू शकतो, असा इशाराही दिला. त्यांनी राखीव साठा, देशांतर्गत उत्पादन क्षमता आणि पुरवठादार मित्र देशांशी अधिक चांगले संबंध निर्माण करण्याचे आवाहन केले. अलीकडील धक्क्यांना त्यांनी एक ‘इशारा’ म्हटले असून, सरकारने आणि उद्योगांनी तो वाया जाऊ देऊ नये, असेही ते म्हणाले.
