Raghuram Rajan India GDP Growth statement triggers debate on employment: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. आता त्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या जीडीपी आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते जर देशाची अर्थव्यवस्था इतक्या वेगाने वाढत असेल, तर तरुणांसाठी पुरेशा प्रमाणात रोजगार का निर्माण होत नाहीत? राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या या वाढीबाबत शंका व्यक्त केली.

मंगळवारी, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सांगितले की भारतीय अर्थव्यवस्था ७.८ टक्क्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगाने वाढली आहे. या तिमाहीसाठी जीडीपी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ७ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या जलद आर्थिक वाढीच्या बाबतीत काही गंभीर चिंताजनक बाबी आहेत. या मुलाखतीत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर अर्थव्यवस्था खरोखरच इतक्या वेगाने वाढत असेल, तर मग अधिक रोजगार का निर्माण होत नाहीत आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक का होत नाही?

“हे जीडीपी वाढीचे आकडे खरे आहेत का? जर जीडीपी वाढीचे आकडेच खरे नसतील, तर एकूण अर्थव्यवस्थेबद्दलही शंका निर्माण होते. यात काही विसंगती आहेत ज्यांचा विचार करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जर आपण इतक्या वेगाने प्रगती करत आहोत, तर मग अधिक रोजगार आणि चांगल्या दर्जाचे रोजगार का निर्माण होत नाहीत? तसेच गुंतवणूक का होत नाही? आपले उद्योजक गुंतवणूक करण्यास इतके कचरत का आहेत? एफडीआय मोठ्या प्रमाणावर का येत नाही? आपण आकडेवारीची उलटसुलट मांडणी करून बराच काळ चर्चा करू शकतो आणि वेगवेगळे दृष्टिकोन मांडू शकतो”, असे रघुराम राजन म्हणाले.

पुढे राजन यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे का? तसेच, ज्या क्षेत्रांमध्ये आपली उपस्थिती आहे, तिथे आघाडीवर राहण्यासाठी कोणते उपाय योजले जात आहेत.

“जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशी असतील, तर मला वाटते की आपल्यासमोर एक मूलभूत समस्या आहे. कारण, हा आपल्यासाठी ‘लोकसंख्याविषयक लाभांशाचा’ (demographic dividend) काळ आहे. जर आपण सर्वांसाठी पुरेसे रोजगार निर्माण करू शकलो नाही, तर हा लोकसंख्याविषयक लाभांश गमावण्याचा धोका निर्माण होईल”, असे राजन यांनी म्हटले.

खोट्या प्रचाराचा आरोप

रघुराम राजन यांची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, आरिन कॅपिटलचे अध्यक्ष आणि इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आणि दावा केला की, काही स्वार्थ साधू गटांकडून रोजगाराबाबत “खोटा प्रचार” केला जात आहे. अशी परिस्थिती टाळण्यासाठी ईपीएफओ (EPFO) द्वारे रोजगाराची आकडेवारी जाहीर करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी विनंतीही पै यांनी पंतप्रधान मोदींना केली.