Raghuram Rajan RBI Rupee Measures: बाह्य घटकांसह देशांतर्गत घटकांमुळे गेल्या काही महिन्यांपासून रुपयाची डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरण होत आहे. रुपयाने ९७ रुपयांची निचांकी पातळी गाठली असून, परिस्थिती न बदलल्यास रुपया १०० च्या पातळीखाली कोसळण्याची भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. रुपयाच्या या सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी, त्यांच्या कार्यकाळात रुपयाची घसरण रोखण्याची काही उपाययोजना केल्या होत्या. त्याची सध्या चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर असताना रघुराम राजन यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांवर २०१६ मध्ये वित्तीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी फायनान्शिअल एक्सप्रेसमध्ये व्यक्त केलेल्या मतांचा आढावा घेऊया.
१) रुपया स्थिर करणे:
रुपयाची अस्थिरता नियंत्रणात ठेवणे ही राजन यांची सर्वात मोठी कामगिरी आहे, असे विश्लेषकांना त्यावेळी वाटत होते. ईवाय इंडियाचे तत्कालीन मुख्य धोरण सल्लागार डी. के. श्रीवास्तव म्हणाले होते, “माझ्या मते, आरबीआयने रुपयासाठी जे केले ते म्हणजे रुपयाला त्याच्या सोयीस्कर मर्यादेत प्रभावीपणे सांभाळले. कोणतीही विशिष्ट पातळी लक्ष्य केली नाही. जेव्हा जेव्हा आरबीआयला वाटले की रुपया त्याच्या पातळीपलीकडे घसरत आहे, तेव्हा त्यांनी परकीय चलन साठा विकला. त्यामुळे, त्या अर्थाने डॉलरच्या प्रभावी खरेदी-विक्रीमुळेच रुपयातील अस्थिरता नियंत्रणात राहिली.”
येस बँकेच्या तत्कालीन मुख्य अर्थतज्ज्ञ शुभदा राव यांनीही याला दुजोरा दिला होता. त्यांच्या मते, “राजन यांनी अपेक्षांचे व्यवस्थापन अत्यंत प्रभावीपणे केले. राजन यांच्या कार्यकाळात महागाईचा आलेख सुधारला आणि ती ३०० ते ४०० आधार अंशांनी (bps) खाली आली. तसेच त्यांनी निश्चित केलेली मौद्रिक धोरणाची चौकट या सर्व घटकांमुळे जागतिक बाजारपेठेत रुपया अधिक आकर्षक बनला.”
२) पतधोरणातील पारदर्शकता
‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट इंडिया’चे तत्कालीन मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. अरुण सिंग यांनी ‘FE Online’ला सांगितले होते की, “पतधोरण आराखड्याच्या माध्यमातून आणि अगदी स्वतःच्या धोरणांद्वारेही, राजन यांना पतधोरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणणे शक्य झाले. यापूर्वीच्या काळात, मध्यवर्ती बँक प्रमुख व्याजदरांबाबत अचानक निर्णय घेऊन बाजाराला अनपेक्षित धक्का देत असे. याच्या अगदी उलट, आता लोकांना आणि बाजाराला धोरणांमधील बदलांचा आधीच अंदाज घेणे शक्य झाले आहे. महागाई नियंत्रणाच्या उद्दिष्टांबाबत आरबीआयने स्वीकारलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे, संवादप्रक्रिया अधिकच सुधारली.”
३) परकीय चलन साठा:
एडलवाईस सिक्युरिटीजच्या करन्सी विभागाच्या तत्कालीन प्रमुख सजल गुप्ता म्हणाल्या होत्या की, “परकीय चलन साठ्याच्या आघाडीवर, रघुराम राजन यांनी एफआयआयंसाठी कर्ज मर्यादा खुली केल्यामुळे परकीय चलन साठा जमा होण्यास मोठी मदत झाली. त्यांनी अगदी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनाही सूचीबद्ध नसलेल्या बॉण्ड्समध्येही गुंतवणूक करण्याची संधी दिली. या सर्व गोष्टी गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत करतात.”
येस बँकेच्या राव यांनी देखील परकीय चलन साठा उभारण्याचे श्रेय रघुराम राजन यांना दिले होते. “त्यांनी एक असा निधी उभारला, ज्यामुळे ब्रेक्झिटसारख्या घटनांनंतरही रुपयाची घसरण रोखण्यास मदत झाली”, असे त्या म्हणाल्या होत्या.
