Raghuram Rajan US Fed Interest Rate Hike update on global inflation impact: वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवावेत, असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. “फेडने व्याजदर वाढवायला हवेत किंबहुना ते आधीच वाढवायला हवे होते. सध्या फेड ज्या भूमिकेत आहे, त्यापेक्षा माझी भूमिका अधिक कठोर असेल”, असे राजन यांनी ब्लूमबर्ग टेलिव्हिजनच्या हसलिंदा अमीन यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

महागाई वाढलेली असल्याने फेड डिसेंबरमध्ये व्याजदर वाढवेल अशी बाजारांना अपेक्षा आहे, तर दुसरीकडे बॉण्ड यील्ड्समधील मोठी वाढ हे दर्शवते की गुंतवणूकदार सप्टेंबरमध्येही व्याजदरवाढीची शक्यता गृहीत धरत आहेत.

“मला वाटते की सध्या आर्थिक परिस्थिती प्रतिबंधात्मक नाही. अमेरिकेची आर्थिक वाढ डेटा सेंटर्समधील अत्यंत मजबूत गुंतवणुकीमुळे होत आहे. अमेरिकेची वित्तीय तूटही खूप मोठी आहे, जी लवकरच कमी होण्याची शक्यता दिसत नाही”, असे रघुराम राजन यांनी नमूद केले.

अमेरिकन ग्राहक आपली बचत खर्च करत आहेत. “जेव्हा या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला जातो, तेव्हा असे दिसून येते की अर्थव्यवस्थेची गती रोखली गेलेली नाही”, असे राजन म्हणाले.

फेडरल रिझर्व्हचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यापासून केव्हिन वॉर्श यांची संवाद साधण्याची पद्धत काहीशी अस्थिर राहिली आहे. जुलै महिन्यातील धोरणात्मक बैठकीनंतर, त्यांनी अर्थव्यवस्थेबाबतच्या आपल्या दृष्टिकोनाबद्दल फारशी माहिती दिली नव्हती. तसेच व्याजदरांबाबत भविष्यातील दिशा स्पष्ट करणे टाळले होते.

गुंतवणूकदारांनी त्यांच्या या विधानांचा अर्थ असा लावला की, महागाई पुन्हा निर्धारित लक्ष्यापर्यंत खाली आणण्याबाबत त्यांच्यात निश्चयाचा अभाव आहे. परिणामी, दीर्घकालीन बाँड यिल्डचा दर गेल्या दोन दशकांतील उच्चांकावर पोहोचला.

राजन मात्र फेड प्रमुखांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. “वॉर्श यांची समज अचूक आहे”, असे म्हणत राजन यांनी नमूद केले की, “ते महागाईच्या पूर्णपणे विरोधात आहेत” आणि ती कमी करण्यास उत्सुक आहेत, हे त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

यूएस फेडच्या टास्क फोर्समध्ये रघुराम राजन

जगातील सर्वात शक्तिशाली मध्यवर्ती बँक असलेल्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने या महिन्याच्या सुरुवातीला एक मोठा निर्णय घेतला होता. फेडने आपल्या संपूर्ण आर्थिक धोरणांची आणि तब्बल ६.७ ट्रिलियन डॉलरच्या ताळेबंदाची पुनर्रचना करण्यासाठी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन याचे नेतृत्व करणार आहेत. फेडचे नवे अध्यक्ष केव्हिन वॉर्श यांनी हाती घेतलेल्या या माहिमेमुळे जागतिक अर्थकारणात ‘इझी मनी’ म्हणजेच सुलभ कर्जाचे युग संपण्याचे संकेत मिळत आहे.