Raghuram Rajan US Federal Reserve economy policy task force: जगातील सर्वात प्रभावशाली मध्यवर्ती बँक असलेल्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने वेगाने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेत कशा प्रकारे कार्य करावे, याची दिशा ठरण्यासाठी अर्थशास्त्र, व्यवसाय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील काही दिग्गज व्यक्तींची मदत घेण्याचे ठरवले आहे. यामध्ये अर्थतज्ज्ञ रघुराम राजन आणि राज चेट्टी, तसेच मायक्रोसॉफ्टच्या अधिकारी आशा शर्मा यांची तीन समित्यांचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
‘फेड’चे प्रमुख केविन वॉर्श यांनी पाच स्वतंत्र टास्क फोर्सेस सदस्यांची घोषणा केली. हे टास्क फोर्स फेडरल रिझर्व्हच्या कामकाजातील महत्त्वाच्या पैलूंचा आढावा घेतील. यामध्ये महागाई आणि संवाद यंत्रणेपासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), उत्पादकता आणि ट्रिलियन्स डॉलर्सच्या ‘बॅलन्स शीट’चे व्यवस्थापन यांसारख्या बाबींचा समावेश असेल.
फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी पदभार स्वीकारल्यानंतर १७ जून रोजी झालेल्या आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत या उपक्रमाची घोषणा केली होती.
“महागाई आटोक्यात ठेवणे आणि जास्तीत जास्त रोजगार निश्चित करण्याबाबत फेडरल रिझर्व्हची कटिबद्धता अढळ आहे. तसेच, आपल्या कार्यकक्षेतील उद्दिष्टे कठोरपणे आणि निष्ठेने साध्य करण्याचा आमचा निर्धारही पक्का आहे”, असे वॉर्श यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
“एका संस्थेच्या रूपात आमची कार्यक्षमता अधिक प्रभावी करण्यासाठी विविध क्षेत्रांतील सर्वोत्तम तज्ज्ञांनी आमच्यासोबत काम करण्यास सहमती दर्शवली आहे, याचा मला अभिमान वाटतो. अत्यंत महत्त्वाच्या अशा या काळात आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ‘फेड’ सर्वोत्तम स्थितीत असेल याची खात्री करणे हे यामागील उद्दिष्ट आहे”, असेही त्यांनी नमूद केले.
‘फेड’च्यया प्रत्येक टास्क फोर्सचे नेतृत्व शैक्षणिक क्षेत्र, उद्योगजगत आणि मध्यवर्ती बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत संयुक्तपणे केले जाईल आणि त्यांना फेडरल रिझर्व्हच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. हे टास्क फोर्स स्वतंत्रपणे काम करतील आणि ‘फेडरल ओपन मार्केट कमिटी’ला पुराव्यांवर आधारित शिफारसी सादर करतील. ही आढावा प्रक्रिया या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल, अशी अपेक्षा वॉर्श यांनी व्यक्त केली आहे.
रघुराम राजन यांची भूमिका
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे हार्वर्डच्या अर्थशास्त्रज्ञ कॅरेन डायनन आणि फेडरल रिझर्व्हचे माजी गव्हर्नर जेरेमी स्टीन यांच्यासोबत ताळेबंद धोरणावर काम करतील.
हे पॅनेल फेडरल रिझर्व्हच्या सध्याच्या ताळेबंद व्यवस्थेचे खर्च, फायदे आणि परिणाम तपासेल, ज्यामध्ये त्यांची मालमत्ता आणि चलनविषयक धोरणाच्या अंमलबजावणीतील त्यांची भूमिका यांचा समावेश आहे.
राजन सध्या शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये वित्त विषयाचे प्राध्यापक आहेत. २०१३ ते २०१६ दरम्यान आरबीआयचे गव्हर्नर म्हणून त्यांनी भारताला ‘टेपर टँट्रम’मधून बाहेर पडण्यास मदत केली होती. तसेच बँकिंग प्रणाली मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
