Rahul Gandhi Modi Govt UPI Charges : केंद्र सरकारने २००० रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू करण्यास बंदी घातली आहे. मात्र, यामुळे २००० रुपयांवरील व्यवहारांवर शुल्क लागू होण्याची शक्यता आहे. यावरुन आता विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने यूपीआय (UPI) वर फी आकारण्याचा मार्ग आता हळूच खुला केला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

मोदी सरकारचा नवीन निर्णय काय?

सोमवारी (१४ सप्टेंबर २०२६) रोजी मोदी सरकारने एक अधिसूचना जारी करत रुपे डेबिट कार्ड किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे २,००० रुपयांपर्यंतचे व्यवहार करणाऱ्या किंवा स्वीकारणाऱ्या व्यक्तींवर कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क आकारता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, २००० रुपयांपेक्षा जास्त मूल्यांच्या व्यवहारावर सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही.

राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत टीका आहे. “२,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मर्चंट (व्यापारी) यूपीआय व्यवहारांवर आता एमडीआर लावला जाऊ शकतो. या व्यवहारांची संख्या जरी फक्त ५% असली, तरी यूपीआयच्या एकूण व्यवहारांच्या मूल्यातील जवळपास ६५% वाटा याच मोठ्या व्यवहारांचा आहे. सरकारने ग्राहकांकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही असे म्हटले आहे, पण दुकानदारावर लादलेली ही फी शेवटी कुठे जाणार? ती वस्तूंच्या किमतीत जोडली जाऊन शेवटी ग्राहकांच्याच खिशातून वसूल केली जाईल. अमेरिकन पेमेंट कंपन्या बऱ्याच काळापासून भारताच्या ‘झिरो-एमडीआर’ धोरणाला विरोध करत होत्या. आता मोदी सरकारने याच दिशेने धोरण बदलण्याचा मार्ग मोकळा केल्याचे दिसत आहे. यूएस ट्रेड डीलप्रमाणेच, पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा अमेरिकेच्या दबावासमोर झुकले आहेत” असे गंभीर आरोप यातून केले आहेत.

२००० रुपयांपेक्षा जास्तीच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार?

केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटसंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या युपीआय व्यवहारांवर मर्चेंट डिस्काउंट रेट लागू करण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा केला आहे. संसदेत पारित झालेल्या सुधारित विधेयकानंतर आणि वित्त मंत्रालयाच्या ताज्या राजपत्र अधिसूचनेनुसार, या नव्या धोरणामुळे येत्या काळात मोठ्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाऊ शकते, ज्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

काँग्रेसच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

यूपीआय व्यवहार शुल्कावरुन आता राजकीय युद्ध पेटले आहे. काँग्रेसच्या एक्स अकाउंटवरुन मोदी सरकार आता यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापुढे २,००० रुपयांवरील यूपीआय व्यवहारांवर ०.५% चार्ज वसूल केले जाणार असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. म्हणजे ५००० रुपये पाठवले तर २५ रुपये शुल्क आकारले जाईल. या पोस्टवर भाजपने पलटवार केला आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसच्या ट्विटला खोटं असल्याचं लिहित टीका केली आहे. २००० रुपयांवरील यूपीआय व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू नसल्याचे अमित मालवीय यांनी म्हटलं आहे. १४ सप्टेंबरच्या अधिसूचनेत केवळ २००० रुपयांपर्यंत यूपीआय व्यवहार शुल्कमुक्त असल्याचे म्हटले असल्याचं मालवीय यांनी सांगितलं आहे.

ग्राहकांच्या खिशावर कसा होणार परिणाम?

  • जरी सरकारने स्पष्ट केले की ग्राहकांकडून थेट कोणतेही शुल्क वसूल केले जाणार नाही, तरी आर्थिक विश्लेषकांच्या मते या बदलाचे अप्रत्यक्ष परिणाम ग्राहकांवर होऊ शकतात.
  • जर दुकानदारांना मोठ्या व्यवहारांवर बँक किंवा पेमेंट गेटवेला एमडीआर शुल्क द्यावे लागले, तर व्यापारी हा खर्च भरून काढण्यासाठी उत्पादनांच्या किंवा सेवांच्या किमतीत वाढ करू शकतात. परिणामी, महागाईचा भार शेवटी ग्राहकांच्या खिशावर पडू शकतो.
  • काही व्यापारी २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या डिजिटल पेमेंटवर अतिरिक्त ‘सर्चार्ज’ची मागणी करू शकतात किंवा रोख व्यवहारांना अधिक प्राधान्य देण्याची शक्यता बळावू शकते.