Rahul Gandhi Investment Portfolio: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज (१९ जुलै २०२६) ५६ वर्षांचे झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचू एकूण संपत्ती २०.४० कोटी रुपये आहे. राहुल गांधी यांच्या प्रतिज्ञापत्रात २४ सूचीबद्ध कंपन्यांमधील थेट इक्विटी गुंतवणूक, सात योजनांमधील म्युच्युअल फंड गुंतवणूक, सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतील शिल्लक रक्कम, बँक ठेवी, दागिने आणि गुरुग्राम व दिल्लीतील स्थावर मालमत्ता यांचा उल्लेख आहे.

हे आकडे गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आधारित आहेत. ही मूल्ये १५ मार्च २०२४ रोजी जाहीर केल्यानुसार आहेत आणि त्यात सध्याच्या बाजारभावांचा समावेश नाही.

४.३३ कोटी रुपयांचे शेअर्स

२०२४ च्या प्रतिज्ञापत्रानुसार राहुल गांधी यांच्या इक्विटी होल्डिंगचे मूल्य सुमारे ४.३३ कोटी रुपये होते. यामुळे त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक पिडीलाइट इंडस्ट्रीजमध्ये होती. ज्याचे मूल्य ४२.२७ लाख रुपये होते. त्याखालोखाल बजाज फायनान्स ३५.८९ लाख रुपये, नेस्ले इंडिया ३५.६७ लाख रुपये, एशियन पेंट्स ३५.३० लाख रुपये आणि टायटन कंपनी ३२.५९ लाख रुपये यांचा समावेश होता.

राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रामुख्याने ग्राहक, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान आणि रसायन कंपन्यांचा समावेश आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या इतर लार्ज-कॅप कंपन्यांमधील गुंतवणुकीत हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, आयटीसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एलटीआय माइंडट्री यांचा समावेश आहे.

गांधी यांनी डिव्हिज लॅबोरेटरीज, दीपक नायट्राइट, जीएमएम फाउडलर, गारवारे टेक्निकल फायबर्स, अल्काइल अमाईन्स केमिकल्स, फाइन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज, सुप्राजित इंजिनिअरिंग, मोल्ड-टेक पॅकेजिंग, ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया, डॉ. लाल पॅथ लॅब्स, इन्फो एज, विनाइल केमिकल्स आणि व्हर्टोझ ॲडव्हर्टायझिंगमधील आपली गुंतवणूक देखील जाहीर केली होती.

याव्यतिरिक्त, प्रतिज्ञापत्रात नॅशनल हेराल्ड प्रकाशनाशी संबंधित असलेल्या यंग इंडियन या असूचीबद्ध कंपनीच्या १९०० इक्विटी शेअर्सची नोंद आहे, ज्यांचे मूल्य १.९० लाख रुपये आहे.

३.८१ कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड

राहुल गांधी यांनी म्युच्युअल फंडांमध्येही मोठी गुंतवणूककेली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी म्युच्युअल फंड विविध सात योजनांमध्ये सुमारे ३.८१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सर्वात मोठ्या दोन फंड होल्डिंगमध्ये १.२४ कोटी रुपयांचा एचडीएफसी स्मॉल-कॅप फंड आणि १.०२ कोटी रुपयांचा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रेग्युलर सेव्हिंग्ज फंड यांचा समावेश होता. त्यानंतर ७९.०१ लाख रुपयांचा एचडीएफसी हायब्रीड डेट फंड होता. उर्वरित म्युच्युअल फंड होल्डिंगमध्ये पराग पारिख, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल योजनांचा समावेश होता, ज्यांचे मूल्य प्रत्येकी अंदाजे १७ लाख ते २० लाख रुपयांच्या दरम्यान होते.

गांधींच्या सूचीबद्ध शेअर्स, म्युच्युअल फंड आणि सॉवरेन गोल्ड बॉण्ड्सचे एकत्रित मूल्य ८.३२ कोटी रुपये होते. याचा अर्थ, त्यांच्या ९.२५ कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेमध्ये बाजाराशी संबंधित मालमत्तेचा मोठा वाटा होता.

गोल्ड बॉण्ड्स, पीपीएफ, ठेवी आणि दागिने

राहुल गांधी यांच्या प्रतिज्ञापत्रात २०२०-२१ मालिकेतील १५.२१ लाख रुपये मूल्याच्या सॉवरेन गोल्ड बॉण्ड्सच्या २२० युनिट्सचा देखील उल्लेख आहे. गांधी यांनी एसबीआय बँकेत ६१.५२ लाख रुपयांची सार्वजनिक भविष्य निधी शिल्लक असल्याचे जाहीर केले होते. एसबीआय आणि एचडीएफसी बँकेतील त्यांच्या खात्यांमध्ये एकूण २६.२५ लाख रुपये जमा होते, तर हातातील रोख रक्कम ५५,००० रुपये होती. त्यांनी ३३३.३० ग्रॅम वजनाचे सोने आणि दागिने देखील घोषित केले होते, ज्यामध्ये १६८.८० ग्रॅम निव्वळ सोने असून त्याचे मूल्य त्यावेळी ४.२० लाख रुपये होते.

११.१५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता

राहुल गांधी यांच्याकडे गुरुग्राममधील सिग्नेचर टॉवर्समध्ये व्यावसायिक कार्यालयांची जागा आहे. प्रतिज्ञापत्रात या दोन युनिट्सचे मूल्य ९.०५ कोटी रुपये नमूद करण्यात आले होते. याचबरोबर त्यांनी नवी दिल्लीतील मेहरौली येथील सुलतानपूरमधील शेतजमीन आणि फार्महाऊस इमारतीमधील वारसा हक्काने मिळालेल्या हिश्श्याचीही घोषणा केली होती. ही मालमत्ता त्यांची बहीण खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासोबत संयुक्त मालकीची असून तिचे मूल्य २.१० कोटी रुपये आहे.