Rahul Gandhi Ramlila Maidan Protest : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, यामुळे ऐन सणासुदीत दिल्लीतील प्रमुख बाजारपेठांमध्ये व्यापार ठप्प होण्याची भीती, चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) या व्यापारी संघटनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये हे आंदोलन दिवाळीनंतर, म्हणजेच १०-११ नोव्हेंबरनंतर आयोजित करावे, अशी विनंती व्यापाऱ्यांनी केली आहे.
निवडणूक आयोग आणि एसआयरआर विरोधात आंदोलनाची हाक
विरोधी पक्षांची इंडिया आघाडी १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रामलीला मैदानावर हे आंदोलन करणार आहे. काँग्रेसच्या दाव्यानुसार या रॅलीत तब्बल १० लाख लोक सहभागी होणार आहेत, तर दिल्ली पोलिसांच्या अंदाजानुसार सुमारे ५० हजार लोक येण्याची शक्यता आहे.
१२,००० कोटींचा व्यापार धोक्यात
सीटीआयचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी सांगितले की, या आंदोलनामुळे मध्य आणि जुन्या दिल्लीतील घाऊक व किरकोळ बाजारांमधील १०,००० ते १२,००० कोटी रुपयांच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो. व्यापाऱ्यांनी यापूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही तीन वेळा पत्र लिहून रॅलीचे वेळापत्रक बदलण्याची मागणी केली होती. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, व्यापाऱ्यांचा आंदोलनाला विरोध नाही, तर त्याच्या वेळेला विरोध आहे. १ नोव्हेंबर हा दिवाळीच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. जर १० लाख लोक आणि १५,००० ते २०,००० वाहने मध्य दिल्लीत आली, तर २० हून अधिक प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प होतील.
वाहतूक कोंडींची चिंता
व्यापाऱ्यांच्या मते, आंदोलनामुळे जे.एल.एन. मार्ग, बहादूर शाह जफर मार्ग आणि नेताजी सुभाष मार्ग यांसारख्या प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होईल. परिणामी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीचा माल बाजारात कसा पोहोचणार? असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनामुळे चांदनी चौक, सदर बाजार, कनॉट प्लेस, खारी बाओली, भगीरथ पॅलेस, काश्मिरी गेट, चावडी बाजार, करोल बाग आणि दरीबा कलान यांसारख्या मोठ्या बाजारपेठांना फटका बसण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये दररोद ५००० ट्रकची आवक
नरेला आणि ओखलासह ५६ औद्योगिक क्षेत्रांतून दररोज सुमारे ५,००० ट्रक आणि टेम्पो या बाजारपेठांमध्ये माल घेऊन येतात. तसेच, सुमारे ३,००० वाहने नॅशनल कॅपिटल रिजन मधील २५ शहरांमध्ये आणि देशाच्या इतर भागांत माल पोहोचवतात. १० ऑक्टोबर रोजी झालेल्या एका आंदोलनात केवळ ५,००० ते ७,००० लोक सहभागी झाले होते, तरीही मध्य दिल्लीतील वाहतूक तब्बल ८ तास विस्कळीत झाली होती.
अंदोलनाचे ठिकाण बदलण्याची मागणी
वाहतूक कोंडी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रामलीला मैदानावऐवजी हे आंदोलन बुरारी मैदानावर हलवावे, अशी मागणी सीटीआयने सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. बुरारी मैदानावर जवळपास १५,००० वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था उपलब्ध असल्याचे व्यापाऱ्यांनी पत्रात लिहिलं आहे. आता काँग्रेस आणि इंडिया आघाडी काय निर्णय घेते? याकडे संपूर्ण व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
